आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅशलेस व्यवहाराने आर्थिक व्यवस्था सुरक्षित, गोवा राज्याचे संचालक उपेंद्र ठाकूर यांचा विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहरु युवा केंद्राच्या वतीने रोखमुक्त (कॅशलेस) व्यवहार मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना महाराष्ट्र गोवा राज्याचे संचालक उपेंद्र ठाकूर. - Divya Marathi
नेहरु युवा केंद्राच्या वतीने रोखमुक्त (कॅशलेस) व्यवहार मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना महाराष्ट्र गोवा राज्याचे संचालक उपेंद्र ठाकूर.
नगर - कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सध्या भारताची वाटचाल सुरु अाहे. तरुण पिढीच्या माध्यमातून कॅशलेसचे स्वप्न साकारले जाणार आहे. कॅशलेस व्यवहाराने आर्थिक व्यवस्था सोपी सुरक्षित होईल, असा विश्वास नेहरु युवा केंद्र महाराष्ट्र गोवा राज्याचे संचालक उपेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला.
नेहरु युवा केंद्राच्या वतीने टिळक रस्त्यावरील कार्यालयात आयोजित रोखमुक्त (कॅशलेस) व्यवहार या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. उपसंचालक ए.आर. पांडे, जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, लेखपाल हरिष ठाकरे, जिल्हा बँक बचत गट विभागाच्या विद्या तन्वर यावेळी उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले , परिवर्तनासाठी घेतल्या गेलेल्या निर्णयाला नेहमीच बाधा येतात. मात्र, लोकहिताच्या निर्णयांना कालांतराने समर्थन मिळू लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करुन काळ्या धनाला लगाम लावण्यासाठी रोखमुक्ती व्यवहार करण्याचा निर्णय घेतला. गावपातळीवर रोखमुक्त व्यवहाराचे ज्ञान देऊन त्याचे फायदे पटवून दिल्यास त्याचा स्वीकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, नागरिकांची रोख व्यवहाराची मानसिकता बदलल्यास रोखमुक्त व्यवहार अंगीकारणे सहज शक्य होणार अाहे.
बाबाजी गोडसे म्हणाले, रोखमुक्त व्यवहार हा भ्रष्टाचार रोखण्याचा मूलमंत्र आहे. नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्तरावर रोखमुक्त (कॅशलेस) व्यवहार कसे करावे, याचे ज्ञान देऊन त्यांना प्रेरित केले जाणार आहे. याअगोदर स्वयंसेवकांना त्याचे प्रशिक्षण देऊन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत कार्यशाळेचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ए. आर. पांडे म्हणाले, हजार पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर बँकेत पैसे भरण्यासाठी काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. रोखमुक्त व्यवहाराची अर्थव्यवस्था आत्मसात करण्यासाठी त्याच्या प्रचार प्रसारासाठी राज्यात नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेसाठी महेश शिंदे, पोपट बनकर, सोनाली दिलवाले उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...