आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cattle Health Day By Day Down In Nagar District Foddar Camp

नगर जिल्ह्यातीली छावण्यांत होताहेत जनावरे निकामी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यातील सर्व जनावरांच्या छावण्यांत आवश्यकतेच्या निम्माच चारा सध्या पुरवण्यात येत आहे. त्यामुळे जनावरे कुपोषित होत असून त्यांच्यात त्राण राहिलेले नाही. एकीकडे जनावरे उपाशी, तर छावण्यांत राहून दूध उत्पादकाचा रोजगारही बुडत असल्याने तोही आर्थिक संकटात, अशी स्थिती सरकारने आणली आहे. अजून चार महिने जायचे आहेत. तोपर्यंत जनावरे कशी जगणार, असे प्रश्नचिन्ह शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसते आहे.

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे छावणी आहे. ऊन रणरणत होते. जनावरांसाठी केलेल्या तात्पुरत्या निवार्‍यांचे छत उसाच्या पाचटाने झाकलेले. ते दाट नसल्याने अनेक ठिकाणी त्यातून ऊस गळत होते. जनावरांबरोबरच त्यांचे मालक कसेबसे सावली धरून आपापली कामे करीत होते. ‘सरकारला जनावरं जगवायची की मारायची काही कळत नाही,’ अशी एका पशुमालकाची प्रतिक्रिया सर्व काही सांगून जात होती.

दुष्काळाने उग्ररूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत शासनाने जनावरांच्या चारा अनुदानात कपात केली आहे. आठवड्यातून तीनच दिवस पशुखाद्य देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा दूधउत्पादकांवर अन्याय असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. छावण्यांत जनावरे अर्धपोटी राहात आहेत. अनेक जनावरे अंगात त्राण नसल्याने बसून आहेत. वास्तविक पाहता सरकार आधी देत असलेले जनावरामागचे 80 रुपयांचे अनुदान शंभर करणे व प्रत्येक जनावराला रोज किमान अडीच किलो पशुखाद्य देण्याची गरज दूधउत्पादकांनी व्यक्त केली.

‘जाणकार’नेत्यांचे दुर्लक्ष
जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. दूधधंद्यात ते जाणकार समजले जातात. मात्र, सरकार चाराकपातीसारखे निर्णय घेत असताना या मंत्र्यांनी विरोध का केला नाही, हा प्रश्न आहे. दूध धंद्याला मारक ठरणार्‍या निर्णयास विरोध करण्याची मानसिकता आमदार, खासदारांबरोबरच विरोधी पक्षांचीही नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न आहे.
छावण्यांमधील जनावरांची अवस्था सध्या अशी आहे.
छावण्यांची संख्या (कंसात जनावरे)
नगर : 44 (29046), कर्जत : 57 (33283), पाथर्डी : 55 (28111), श्रीगोंदे : 51 (37796), जामखेड : 10 (8308), पारनेर : 12 (5746), शेवगाव : 30 (19109).
जनावरांचे व माणसांचेही हाल
छावणीत जनावरे ठेवल्यावर तेथे एक माणसाला राहणे सक्तीचे असते. कारण छावणीतील जनावरांची काळजी कोण घेणार, असा प्रश्न असतो. छावणीत राहिल्यामुळे संबंधित व्यक्तीचा किमान दीडशे रुपयांचा रोजगार बुडतो. पाच-सहा गावांत एकच छावणी असते. त्यामुळे छावणीत राहणार्‍या माणसाचे जेवण घेऊन येणार्‍या त्याच्या मुलांच्या शिक्षणाचेही नुकसान होत आहे. घरी फक्त महिला रहात असल्याने रात्री चोरांची धास्ती असते, ती वेगळी.
जनावरांच्या संख्येत 4 लाखांनी घट
जिल्ह्यात मागील वर्षी 21 लाख जनावरे होती. आता ही संख्या 17 लाख झाली आहे. चार लाख जनावरे कत्तलखान्याकडे गेली आहेत. दुधाच्या उत्पादनातही गतवर्षीपेक्षा 4 लाख लिटरने घट झाली आहे.
सरकारी धोरण चुकीचे..
एकीकडे जनावरांच्या खाद्यात कपात करणारे सरकार जनावरांच्या मांसनिर्यातीसाठी मात्र अनुदान देत आहे. या धोरणाला काय म्हणावे? जनावरे अशा प्रकारे संपली, तर शेतकरी संपणार आहे. कारण, दूध धंदाच सध्या शेतकर्‍यांना जगवत आहे. तो आधारही काढून घेण्याच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. याचे परिणाम केवळ यावर्षी नाही, तर पुढील काळातही भोगावे लागणार आहेत.
निकामी जनावरांचे काय करणार?
मोठय़ा जनावरांना जगवण्यासाठी 20 ते 25 किलो हिरवा चारा, दोन ते अडीच किलो पशुखाद्य आणि 40 ते 50 लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे; परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे छावणीमध्ये जनावरांना जेमतेम 15 किलो चारा मिळतो आहे. आठवड्यातून फक्त तीनच दिवस पशुखाद्य, तेही अर्धा ते एक किलो मिळते. जेमतेम 50 ग्रॅम क्षार मिर्शण दिले जाते. ते तुटपुंजे आहे. हिरवा चारा म्हणून फक्त उसाचे वाढे दिले जात असल्याने त्याचा विपरित परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे. आत्ताच त्यांची पोटे खपाटीला लागली आहेत. सततत्या कुपोषणात ही जनावरे अजून चार महिने तग धरणे अशक्य आहे. जनावरे वाचलीच, तर ती निकामी झाली असतील. त्यामुळे खाटकाला विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.’’ गुलाबराव डेरे, दूध उत्पादक कल्याणकारी संघ, नगर.