आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Probe Into Alleged Fodder Scam In Maharashtra

चारा घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कर्जत व पाथर्डी तालुक्यात झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी संबंधित घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने अनिल शर्मा यांच्या याचिकेवर दिले आहेत. सीआयडीकडून चौकशी होऊनही गेल्या दहा महिन्यांपासून संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. एक महिन्याच्या आत चौकशीत दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताना खंडपीठाने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.

कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील चारा डेपोत गैरव्यवहार झाल्याचे शर्मा यांनी माहितीच्या अधिकारात उघड केले होते. या कागदपत्रांच्या आधारावरच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवला होता. लुनासारख्या वाहनांवरून दहा ते बारा टन ओला ऊस वाहून नेण्याचा पराक्रम संबंधितांनी केल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले होते. तसेच मृत व्यक्तीच्या नावावर चारावाटप केल्याचेही समोर आले. यात चारा उत्पादक, वाहतूकदार, वजनकाटाचालक, देखरेख ठेवणारे महसूलचे अधिकारी व कर्मचारी, डेपोचालक या सर्वांचे संगनमत असल्याचे स्पष्ट झाले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आश्वासनाप्रमाणे बारडगाव दगडी येथील घोटाळ्याची डिसेंबर 2012 मध्ये सीआयडीमार्फत चौकशी करण्यात आली. आठ दिवसांत कारवाईचे आश्वासन देऊनही दहा महिने उलटत आले, तरी संबंधितांवर कारवाई झाली नाही.

तावडे यांच्या सूचनेनुसार शर्मा यांनी 12 सप्टेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल व न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सीआयडीमार्फत झालेल्या चौकशीचा अहवाल सरकारतर्फे खंडपीठात सादर करण्यात आला. सीआयडीऐवजी सीबीआयकडून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी शर्मा यांच्या वतीने अँड. अजित झरेकर यांनी केली. तपासाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत खंडपीठाने चौकशीत दोषी आढळलेल्यांविरुद्ध एक महिन्याच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

सीआयडीच्या चौकशी अहवालात दोषींवर भारतीय दंड विधानाच्या कलम 406, 409, 420, 468, 471 नुसार गुन्हे दाखल करावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडे चारा घोटाळ्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची नव्याने चौकशी होणार असल्याने चारा घोटाळेबाजांचे धाबे दणादले आहेत. '

तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील चाराडेपोत झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अँड. आसावा यांनी लेखीस्वरूपात जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. जुलै 2013 मध्ये केलेल्या तक्रारीसोबत माहितीच्या अधिकारात मिळवलेले पुरावे जोडण्यात आले आहेत. तीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी त्यांच्या तक्रारीवर कोणतीही चौकशी झालेली नाही. अँड. आसावा यांनी गेल्या महिन्यात जिल्हाधिकार्‍यांना पुन्हा स्मरणपत्र पाठवून तक्रारीची आठवण करून दिली आहे. केवळ दंडात्मक कारवाईच्या नोटिसा पाठवण्याऐवजी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अँड.आसावा यांनी केली आहे.

सामान्यांच्या तक्रारींचे काय?
विनोद तावडे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली चारा घोटाळा उघडकीस आणला. त्यांच्या प्रश्नावर सरकारने चौकशीचे आश्वासन दिले. चौकशीही झाली. मात्र, या चौकशीबाबत तावडे यांना व मलाही काही कळवण्यात आले नाही. तावडे यांच्या सूचनेनुसार उच्च् न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात जाण्याचा सल्ला विरोधी पक्षनेत्यांना द्यावा लागतो, यातच सरकार पातळीवरील अनास्था दिसून येते. आम्ही केलेल्या तक्रारीत सत्य असल्याचे सरकार पक्षाने खंडपीठात मान्य केले आहे. यातूनच घोटाळेबाजांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांचे पितळ उघडे पडले आहे.’’ अनिल शर्मा, तक्रारदार.

घोटाळ्याबाबत आवाज उठवणारे तावडे आज नगरमध्ये
चारा घोटाळ्याबाबत सुरुवातीपासून आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे शनिवारी (12 ऑक्टोबर) नगरच्या दौर्‍यावर येत आहेत. केवळ नगरमध्ये नव्हे, तर राज्यात इतर जिल्ह्यांतही चारा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीच केला आहे. आघाडी सरकारमधील काही आजी-माजी मंत्री चारा घोटाळ्यात गजाआड जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत शनिवारी ते कोणती भूमिका मांडतात याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

खुशाल चौकशी करावी
ज्यांना चौकशी करायची आहे, त्यांनी खुशाल चौकशी करावी. मला कुणाच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आवश्यकता वाटत नाही. तेवढा वेळही माझ्याकडे नाही. ’’ बबनराव पाचपुते, आमदार.