आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CCTV Camera On Collage And School Gate At Ahmednagar

शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- विद्यालये, तसेच महाविद्यालयांच्या परिसरात होणार्‍या छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी शहरातील प्रमुख विद्यालये व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तीन प्रमुख महाविद्यालयांत यापूर्वीच सीसीटीव्ही बसवण्यात आले असून उर्वरित महाविद्यालयांनीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

दिल्लीत धावत्या बसमध्ये युवतीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिला व युवतींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर अनेकदा टवाळखोर मुलांकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार होतात. हे टवाळखोर प्रवेशद्वारासमोर उभे राहून शिट्या वाजवतात, तसेच अश्लील हावभाव करून मुलींना त्रास देतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व प्रमुख विद्यालये व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने विद्यालये व महाविद्यालयांच्या प्रमुखांना दिल्या आहेत. अहमदनगर महाविद्यालय, न्यू आर्टस् कॉलेज व सारडा महाविद्यालयात यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रकरणानंतर अन्य महाविद्यालयांनाही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत.सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर छेडछाडीला काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

महिला व मुलींनी न घाबरता छेडछाड करणार्‍यांची तक्रार करावी. तक्रार आल्यानंतर चौकशी करून टगेगिरी करणार्‍यांना समज देण्यात येईल. मुलांच्या भविष्याचा विचार करून पोलिस कायदेशीर कारवाई करत नाहीत. मात्र, वेळ पडली, तर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील. मुलींनी न घाबरता तक्रार करावी यासाठी पालकांनी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. पालकांनी पाठिंबा दिला नाही, तर त्यांचा आत्मविश्वास ढासळत जाईल, असे छेडछाड विरोधी पथकप्रमुख माधवी राजेकुंभार यांनी सांगितले.

शहरात खासगी प्राथमिक शाळा 44, इंग्रजी प्राथमिक शाळा 11, माध्यमिक शाळा 48, कायम विनाअनुदानित शाळा 17, मनपाच्या प्राथमिक शाळा 8, 36 उच्च माध्यमिक शाळा आहेत


ओळखपत्राचा वापर सक्तीचा करावा
पुण्यात र्जमन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नगरसह राज्यातील सर्वच प्रमुख विद्यालये व महाविद्यालयांत, तसेच प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी शिक्षण संस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. छेडछाडीच्या प्रकाराची माहिती देण्यासाठी पोलिसांच्या विशेष निधीतून प्रमुख अधिकार्‍यांसाठी तीन मोबाइल घेण्यात येणार आहेत. छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना ओळखपत्राचा वापर करणे सक्तीचे करावे. वाहनतळावर दुचाकी लावणार्‍यांच्या नावांची नोंद करावी. ’’
- संजय बारकुंड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक.
1091 क्रमांकावर तक्रार करा
छेडछाडीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने मुली व महिलांना तक्रार करण्यासाठी 1091 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. हा क्रमांक वेळेवर लागला नाही किंवा अन्य कारणांमुळे हा क्रमांक व्यग्र असेल, तर (8686991919) हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर 15 ते 20 मिनिटांत हे पथक दाखल होईल.