आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हीची करडी नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरासह जिल्ह्यातील संवेदनशील विसर्जन मिरवणुकांवर यंदा क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सुमारे तीनशेहून अधिक उच्च दर्जाच्या कॅमेरे बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मिरवणुकीची स्थिती पाहण्यासाठी स्क्रीनही लावण्यात येणार असल्यामुळे पोलिसांना नियोजन करणे सोपे जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध ठोस पुरावाच मिळेल. शिवाय कडेकोट पोलिस बंदोबस्तही असणार आहे.

शहरातील मुख्य विर्सजन मिरवणूक रामचंद्र खुंटावरुन सुरू होऊन दिल्लीगेट येथे संपते. या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे चौदा मंडळे सहभागी होतात. मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणे संवेदनशील आहेत. तेथे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस खबरदारी घेतात. तरीही मिरवणूक पुढे नेण्यावरुन मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये वाद होतात. ठरावीक चौकांत शक्तिप्रदर्शन केले जाते. त्यामुळे तणाव निर्माण होऊन पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढतो.
अशा संवेदनशील ठिकाणी यंदा सीसीटीव्ही बसवण्याचा पर्याय महापालिका पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला आहे. देशातील प्रमुख शहरांत उच्च दर्जाची सीसीटीव्ही सेवा पुरवणाऱ्या आय टॅलेंट मीडिया फर्मला हे काम देण्यात आले. रामचंद्र खुंट, आडतेबाजार, तेलीखुंट, घासगल्ली, भिंगारवाला चौक, अर्बन बँक चौक, नवी पेठ चौक, नेता सुभाष चौक, मिरावली दर्गा, चौपाटी कारंजा असा मिरवणुकीचा मार्ग आहे. या सर्व मार्गावर ४२ ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत.

चित्रीकरण पाहण्यासाठी शहरात १० ठिकाणी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. पोलिसांची गस्तही सुरू असेल. छेडछाडविरोधी बॉम्बशोधक पथकही तैनात असेल. दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही पोलिस उपयोग करुन घेत आहेत. त्यामुळे मिरवणुकीतील अनुचित प्रकारांवर पोलिसांना यंदा करडी नजर ठेवता येईल.

भिंगारमधील मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी यंदा सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे. भिंगार पोलिसांच्या वाहनावर सीसीटीव्ही बसवण्यात आला आहे.
विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असून त्यातून उत्तम चित्रीकरण होत आहे.

अतिशय उच्च दर्जाचे चित्रीकरण होणार
मिरवणुकीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून चित्रीकरण करण्याचा निर्णय महापालिका पोलिस प्रशासनाने घेतला आहे. मंगल भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्रजेश गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे गुजराथी यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

बकरी ईदसाठी शहरात बंदोबस्त
बकरी ईदसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त असेल. शहरात अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक उपनिरीक्षक, २०० पोलिस कर्मचारी, एसआरपी प्लाटून, आरसीपी प्लाटून २५ महिला पोलिस कर्मचारी असतील. हाच बंदोबस्त भिंगारच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरला जाईल.

जिल्ह्यातील संवेदनशील मिरवणुकांवर नजर
नगरप्रमाणेच श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, जामखेड, नेवासे येथील विसर्जन मिरवणुका संवेदनशील समजल्या जातात. या सर्व संवेदनशील मिरवणुकांच्या मार्गावर आतापर्यंत १५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विसर्जन मार्ग, विहिरी, बारवा, तसेच हौद संवेदनशील चौकांत हे कॅमेर बसवण्यात आले आहेत. याशिवाय घारगाव, कोपरगाव तालुका शिर्डीत मिळून ११० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर बसवण्यात आले आहेत.

स्वयंसेवक पुढे सरसावले
गणेशोत्सव बकरी ईदचा एकाच वेळी आल्याने यंदा प्रशासनावर अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण आहे. त्यामुळे पोलिसांना मदत करण्यासाठी होमगार्ड असतील. महाविद्यालयांचे स्वयंसेवक स्वत:हून पुढे सरसावले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक चिन्मय पंडित यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कोतवाली पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी ही बैठक झाली. यावेळी कोतवालीचे निरीक्षक सोमनाथ मालकर, तोफखान्याचे निरीक्षक राजेंद्र निकाळजे, भिंगार कॅम्पचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...