आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधीजींनाही ठेवणार होते नगरच्या किल्ल्यात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- १९४२ च्या "चले जाव' आंदोलन पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य नरेंद्र देव आदी १२ राष्ट्रीय नेत्यांबरोबर महात्मा गांधींनाही नगरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात येणार होते. तथापि, ब्रिटिश सरकारचा हा निर्णय काही प्रत्यक्षात अंमलात येऊ शकला नाही. ज्येष्ठ गांधीवादी नेते शंकरराव देव यांच्या "दैव देते पण कर्म नेते' या आत्मवृत्तात यासंबंधीचा उल्लेख आहे. स्वत: शंकररावही नेहरूंसमवेत नगरच्या किल्ल्यात बंदिवासात होते. बरोबर ७३ वर्षांपूर्वी 8 ऑगस्टला "चले जाव'चा नारा महात्मा गांधींनी दिल्यानंतर 9 ऑगस्टला पहाटेच या सर्वांना मुंबईत अटक करण्यात आली. एकाच रेल्वेत या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांना बसवण्यात आलं होतं. मात्र, महात्मा गांधींना चिंचवड स्टेशनवर उतरवून पुण्यातील येरवडा येथील आगाखान पॅलेसमध्ये नेण्यात आलं, तर अन्य १२ नेत्यांना नगरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आलं.
कस्तुरबांच्या निधनानंतर महात्मा गांधींना आगाखान पॅलेसमधून हलवून नगरच्या किल्ल्यात आणण्याचा विचार सरकार करत होतं. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद आजारी असल्याने मुंबईच्या अधिवेशनास येऊ शकले नव्हते. त्यांना सरकारने पाटणा येथे अटक करून हजारीबाग तुरूंगात ठेवण्यात आले होते. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द प्रांतातील तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. या दोघांपैकी राजेंद्र प्रसाद यांनाही नगरच्या किल्ल्यात हलवण्याचा ब्रिटिश सरकारचा विचार होता. तथापि, गांधीजी इतर मंडळींना बरोबर ठेवलं, तर कदाचित स्वातंत्र्य चळवळीसाठी आणखी पोषक वातावरण तयार व्हायला मदत होईल, असे वाटून सरकारने गांधीजींना नगरला आणण्याचा विचार बदलला.

सरदार वल्लभभाई पटेल यांना आपल्याजवळ आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात यावं, तसं केल्यास त्यांच्यावर उपचार करणे मला शक्य होईल, असे गांधीजींनी ब्रिटिश सरकारला लिहिले होते. तथापि, त्यांचे हे म्हणणेही ब्रिटिश सरकारने मान्य केले नाही. नगरच्या किल्ल्यातून सुटल्यानंतरच त्यांची भेट होऊ शकली.
मेजर सँडकची नियुक्ती
नगरच्या किल्ल्यात १२ राष्ट्रीय नेत्यांसाठी विशेष कारागृहाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेला मेजर सँडक हा युरोपियन अधिकारी आधी काळ्या पाण्याची शिक्षा समजल्या जाणाऱ्या अंदमान येथील पोर्ट ब्लेअर येथील सेल्यूलर तुरूंगाचा जेलर होता.