आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांनी सर्वांना 'मराठे' म्हणून एकत्र केले - लेखिका मेधा देशमुख-भास्करन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अाजच्याआधुनिक लष्करी सज्जतेचं शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या रचनेत पहायला मिळतं. प्रबळ अशा मुघल आणि आदिलशाही राज्यकर्त्यांतील उणिवा अचूक हेरून शिवरायांनी आपले डावपेच आखले. महाराजांचे मोठेपण त्यांनी अफजलखानाला मारले यात नसून महाराष्ट्रातील सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना "मराठे' म्हणून एकत्र केले यात आहे, असे शिवाजी महाराजांवर लवकरच प्रकाशित होणाऱ्या "चॅलेंजिंग डेस्टिनी' या इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका मेधा देशमुख-भास्करन यांनी सांगितले.

क्रॉसवर्ड बुक स्टोअरच्या "द राईट प्लेस' या प्रकाशन संस्थेने प्रथमच खास मागणी करून हे पुस्तक लिहून घेतलं आहे. त्याविषयी "दिव्य मराठी'शी संवाद साधताना मूळच्या नगरच्या रहिवासी असलेल्या मेधा म्हणाल्या, या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या मोठेपण नेमके कशात आहे, हे उलगडण्याचा प्रयत्न मी केला आहे. आजच्या पिढीला रूचेल अशा त्यांच्याच भाषेत मी हे पुस्तक लिहिले आहे. मुख्य म्हणजे एका स्त्रीच्या दृष्टिकाेनातून लिहिलेले हे पहिलेच शिवचरित्र आहे. शिवरायांविषयी जाणून घेणाऱ्या जगभरातील पुस्तकप्रेमींसाठी, तसेच इतिहासाच्या अभ्यासकांसाठी हा उत्तम संदर्भग्रंथ ठरेल.

शिवाजी महाराजांची युद्धनिती, त्यांच्या सैन्यदलाची रचना, त्यावर होणारा खर्च, वतनदारी आणि जहागिरीदारी पद्धतीला त्यांनी केलेला विरोध अशा अनेक गोष्टींवर या पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. शिवाजी महाराजांनी आग्ऱ्याच्या किल्ल्यातून आपली सुटका नेमकी कशी करून घेतली, याचे विश्लेषणही यात वाचायला मिळेल.

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या ग्रंथाचा आधार घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी हे पुस्तक लिहिले आहे. आजच्या जागतिक घडामोडींचा संदर्भ घेऊन शिवरायांचे कर्तृत्व इंग्रजीत शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, असे मेधा यांनी नमूद केले.

जास्तीत जास्त वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचावे, या हेतूने या पुस्तकाची ओळख करून देणारी थ्री-डी चित्रफीत तयार करण्यात आली असून ती चित्रपटगृहांमध्येही दाखवली जाणार आहे. क्रॉसवर्डच्या देशभरातील ९२ दुकानांसह अन्य प्रमुख ग्रंथदालनांत हे पुस्तक उपलब्ध झाले आहे.

महिन्यांत मराठी आवृत्ती
यापुस्तकाची मराठी आवृत्ती सहा महिन्यांत निघणार असून त्याचा प्रकाशन समारंभ नगर येथे करण्याचा मानस असल्याचे मेधा देशमुख-भास्करन यांनी सांगितले. मराठी व्यतिरिक्त कन्नड अन्य भाषांमध्येही हे पुस्तक लवकरच उपलब्ध होईल. इंग्रजी आवृत्ती त्यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना अर्पण केली आहे.
बातम्या आणखी आहेत...