आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जत - खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांवर लोक विश्वास ठेवत नाहीत. इतर राज्यांप्रमाणे शासकीय रुग्णालयांची नावे बदलल्यास ही उदासीनता दूर होऊन चित्र बदलेल, असे मत खासदार दिलीप गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित आरोग्य मेळावा, विविध प्रबोधनात्मक दालन व मोफत उपचार तपासणी शिबिराचे उद्घाटन गांधी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटुरकर होते. यावेळी जि. प. सदस्य सुरेखा राजेभोसले, ज्येष्ठ नेते संभाजी भोसले, उपसरपंच नामदेव राऊत, प्रसाद ढोकरीकर, शांतीलाल कोपनर, रवींद्र कोठारी, हरिदास केदारी, उद्धव नेवसे, बापू नेटके आदी उपस्थित होते. तपासणी शिबिरात 1 हजार 170 रुग्ण सहभागी झाले.
गांधी म्हणाले, सरकारी रुग्णालयांनी सर्व सोयी उपलब्ध करून विश्वास संपादन करावा. देशात दुसर्या क्रमांकाचे बजेट आरोग्य विभागाचे आहे. या रुग्णालयांत महागडी यंत्रणा आहे. मात्र, त्याची माहिती जनतेला नाही. यासाठी आरोग्य विभागाने खेडोपाडी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करावे. त्यामुळे जनमानसात प्रबोधन होऊन त्यांचा खासगी रुग्णांलयाकडे ओढा वाढेल, असे त्यांनी सांगितले.
रुग्णांना उत्तम सेवा, मानसिक आधार व योग्य उपचार ही महत्त्वाची त्रिसूत्री आहे. उच्च तंत्रज्ञान, महागडी यंत्रणा, तत्पर सेवकवृंद असतानाही शासकीय रुग्णालयांकडे पाठ फिरवली जाते. ग्रामस्थांची ही मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटुरकर यांनी सांगितले. प्रास्ताविकात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एल. एस. पवार यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. यावेळी विद्यार्थिनींनी स्त्री भ्रूणहत्या या विषयावर भाषणे झाली. पाच वर्षीय चिमुरडी महेक सय्यद हिने स्त्री भ्रूणहत्येविरोधात सर्वांना शपथ दिली. अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे डॉ. मच्छिंद्र वाघ यांनी अंधर्शद्धा व र्शद्धा याबाबत प्रात्यक्षिके दाखवून प्रबोधन केले.
सूत्रसंचालन पत्रकार नीलेश दिवटे यांनी केले. तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मधुकर काळदाते यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.