आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrankant Salunke Spek About State And Business Relation

राज्यातील निम्मे उद्योग बंद; सरकार उदासीन, चंद्रकांत साळुंके यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उद्योजकांचे प्रश्न सोडवण्याची महाराष्‍ट्र सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे राज्यातील 50 टक्के उद्योग बंद पडले आहेत. उद्योग विभागाच्या बैठकांमध्ये वारंवार त्याच विषयांवर चर्चा होते, पण ठोस निर्णय होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपले औद्योगिक धोरण जाहीर करावे. यासंदर्भात स्मॉल अँड मीडियम बिझनेस चेंबर ऑफ इंडियातर्फे जाबही विचारला जाणार आहे, असे या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी सांगितले.

आयएमएस उद्योजकता विकास केंद्रातर्फे यश ग्रँड येथे शुक्रवारी आयोजित जिल्हा उद्योजक परिषदेत ते बोलत होते. यावेळी बीपीएचईचे अध्यक्ष डॉ. एन. एम. अ‍ॅस्टन, मराठा चेंबरच्या नगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, ‘आमी’चे अध्यक्ष अशोक सोनवणे, ब्लस्टर इंजिनिअरिंगचे कारभारी भिंगारे आदी उपस्थित होते. आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते यांनी प्रास्ताविक, तर संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी स्वागत केले.

साळुंखे म्हणाले, चीनशी स्पर्धा करायची असेल, तर राजकारण्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. परिपूर्ण उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी सर्व सहकार्य व प्रशिक्षण व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. नगरचा औद्योगिक विकास का ठप्प झाला आहे, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य व राष्‍ट्रीय पातळीवर चेंबरमार्फत प्रयत्न करण्यात येतील, असे ते म्हणाले उद्योजक हरजितसिंग वधवा व राजू गोरे यांनी जिल्ह्यातील औद्योगिक समस्यांची माहिती दिली. या परिषदेला जिल्ह्यातील सव्वाशे उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋचा तांदुळवाडकर यांनी केले.

मुख्यमंत्री काय कामाचे?
शरद पवार, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, नितीन गडकरी या नेत्यांनी काही प्रमाणात उद्योजकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण नंतरच्या काळात तसे झाले नाही. त्यामुळे इतर राज्ये महाराष्‍ट्राच्या पुढे निघून गेली. उद्योजकांना सक्षम केले, तरच राज्य सक्षम होईल. मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या औद्योगिक समस्या सुटत नसतील, तर काय अर्थ? गुजरातपेक्षा महाराष्‍ट्र पुढे आहे असे त्यांना वाटते. मग त्यांनी उद्योगांची आकडेवारी जाहीर करावी. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात निर्णयक्षमता आहे, पण त्यांनी उद्योजकांचे किती प्रश्न सोडवले, हा एक प्रश्नच आहे, असा खोचक सवाल साळुंखे यांनी केला.

... तर निवडणुकीत उत्तर देऊ
‘राजकारण्यांचे उद्योग’ सुरु आहेत, पण राज्यातील किती उद्योग सुरु आहेत, याची जाण त्यांना नाही. औद्योगिक क्षेत्राने केंद्रात सरकारला बदलायला पाठिंबा दिला. आता राज्यातही तो बदल अपेक्षित आहे. राज्य सरकार लघुउद्योजकांना सहकार्य करत नाही. सर्वच पक्षांमध्ये फक्त सत्ता मिळवण्याची करण्याची चढाओढ लागली आहे, अशी टीका करत उद्योजकांचे प्रश्न सोडवणार नसाल, तर विधानसभा निवडणुकीत उत्तर देऊ, असा इशाराही साळुंखे यांनी यावेळी दिला.
उद्योजकता पुरस्काराने गौरव
या परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या उद्योजकता विकासात मह्त्त्वपूर्ण योगदान देणा-या नऊ उद्योजकांना ‘आदर्श उद्योजक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सतीश गवळी, मधुकर शिंदे, दीपक लांडगे, कविता जाधव-बिडवे, जया औटी, मधुबाला चोरडिया, मंदा निमसे, संजय पारनाईक, मिलिंद कुलकर्णी या उद्योजकांचा समावेश होता.