नगर : दत्तक विधानात पालकांप्रमाणेच बालकही पालकांना स्वीकारते. तथापि, भारतीय पालक मात्र बालकांच्या रंग-रूप, लहान आजार किंवा व्यंगांमुळे बालकांचे दत्तक विधान नाकारतात. परदेशातील पालक अशा नाकारलेल्या बालकांचा स्वीकार सहजतेने करतात, याचे आत्मपरीक्षण व्हायला हवे, असे प्रतिपादन प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ स्वास्थ्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रेणुका पाठक यांनी केले.
स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रातील तिसरे आंतरराष्ट्रीय दत्तक विधान नुकतेच झाले. मागील वर्षांपासून पालकांचा प्रतीक्षेत असणाऱ्या मेघला गंभीर हृदयरोग आहे. त्यास अमेरिकेतील केविन आणि जेनिफर डेल या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या दाम्पत्याने स्वीकारले.
वयाच्या तिशीत असणाऱ्या या दाम्पत्याने या पूर्वी निकारागुआ या देशातील एका वर्षांच्या अनाथ मुलीस दत्तक म्हणून स्वीकारले. मेघचा स्वीकार डॉ. पाठक यांच्या हस्ते केविन आणि जेनिफर यांनी केला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगर जिल्हा वजन-मापे विभागाचे उपमुख्य नियंत्रक रमेश दराडे होते.
औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. शाहूराजे चव्हाण, आंतराष्ट्रीय दत्तक विधान प्रक्रियेत कार्यरत असलेल्या समन्वयक मीनल दाणी, इंग्लंड येथील समाजसेवक निक कॉक्स आणि जॉयस कॉनोली आदी उपस्थित होते. भारतीय पद्धतीने औक्षण करून दत्तक विधान करण्यात आले.
यावेळी डॉ. पाठक म्हणाल्या, दत्तक विधानामुळे बेवारस किंवा अनौरस बालकाला घर-परिवार मिळतो. पण बालकाच्या प्रेम स्पर्शाला आसुसलेल्या पालकांच्या जगण्याला दत्तक मूल पूर्णत्व, अर्थ आणि आशा देते. भारतीय पालक मात्र अवाजवी अपेक्षा ठेवून मुले नाकारतात. अजय वाबळे, बाळासाहेब वारुळे, संतोष धर्माधिकारी, नाना बारसे, वैजनाथ लोहार, रत्ना शिंदे, विजय वेदपाठक, संजय खरात यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.