आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारा डेपोंसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व चारा डेपो पूर्ववत सुरू करावेत, या मागणीसाठी माजी आमदार राजीव राजळे व नगर तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष दादाभाऊ चितळकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक हजार शेतकर्‍यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दीड तास ठिय्या आंदोलन केले. मंत्रालयीन स्तरावर निर्णय झाल्यास चारा डेपो सुरू ठेवण्याचे तोंडी आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.
शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने संपूर्ण रस्ताच आंदोलकांनी व्यापून गेला. एवढा मोठा मोर्चा आला, तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी अवघा एकच पोलिस होता.
सुरुवातीला राजळे व चितळकर यांची भाषणे झाली. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांची भेट घेतली. चारा डेपोंची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवावी, चार्‍याची बिले 10 दिवसांच्या आत मिळावी, राज्यातील सर्व चारा डेपोंमध्ये चार्‍याचा भाव समान असावा, सर्वांना एकदम चारा देणे शक्य नसल्याने प्रत्येकाला किमान सात दिवसांचा चारा द्यावा, शेतकर्‍याकडून फक्त 10 टक्के रक्कम वसूल करावी, चारा डेपोधारकांची बैठक घेऊन अडचणी समजावून घ्याव्यात, अशी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात चार्‍याचा भाव नगरपेक्षा कमी आहे. केवळ नाशिक, बीड जिल्ह्यासारखा भाव मिळावा, अशी मागणी करणे योग्य नाही. चार्‍याच्या भावासंदर्भात शासन जो निर्णय घेईल, त्याप्रमाणेच नगर जिल्ह्यातील चार्‍यालाही भाव मिळेल. 1 ते 7 ऑगस्टपर्यंत शासनाने चारा डेपोंना मुदतवाढ दिली होती. परंतु अडचणींमुळे कोणीही चारा डेपो चालवला नाही. याबाबत मंत्रालयीन स्तरावर निर्णय झाल्यास मुदतवाढ मिळेल, असे तोंडी आश्वासन डॉ. संजीव कुमार यांनी दिले.