आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चावडी आनंद यात्रेत 80 लाखांची विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - चावडी आनंद यात्रा शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये लावण्यात आलेल्या 200 स्टॉल्सना मोठा प्रतिसाद मिळाला. चार दिवसांत तब्बल 80 लाखांची उलाढाल झाली.

बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी चावडी संस्थेमार्फत आनंद यात्रा शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. सावेडी जॉगिंग पार्क समोरील संत निरंकारी भवन येथील मैदानावर 25 डिसेंबरपासून हे प्रदर्शन सुरू होते.

या प्रदर्शनात तीन स्वतंत्र विभाग करण्यात आले होते. प्रवेशद्वारासमोरील पहिल्या विभागात ग्रामीण खेडे साकारले होते. तेथे बारा बलुतेदारांचे पारंपरिक व्यवसायांचे स्टॉल होते. दुसर्‍या विभागात चारचाकी आलिशान कार, मोटारसायकली विक्रेत्यांचे स्टॉल होते. तिसर्‍या विभागात बचत गटांचे स्टॉल होते. त्यात आयुर्वेदिक औषधे, आवळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ, घोंगड्या, इन्व्हर्टर, सोलर वॉटर हीटर, गांडूळ खत व शेणखतावर पिकवलेले धान्य, मसाले लोणची आदींचे स्टॉल होते. कर्जतची शिपी आमटी, थालीपीठ, वांग्याचे भरीत सोबतीला बाजरीची भाकरी व मालवणी पदार्थांचे स्टॉलही होते. पारंपरिक पद्धतीने उत्पादित केलेला शेतमाल, तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चावडी यात्रेत झुंबड उडाली होती. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने अनेक बचत गट व व्यावसायिकांचीही चांगलीच दमछाक झाली.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनात खाद्यपदार्थांच्या रेलचेलीबरोबरच मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (25 डिसेंबर) उखाणे स्पर्धा, बक्षीस, गुरुवारी (26 डिसेंबर) पोवाडा, शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरील एकपात्री नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम झाले. शुक्रवारी (27 डिसेंबर) सायंकाळी सात वाजता भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (29 डिसेंबर) सायंकाळी या प्रदर्शनाचा समारोप झाला.

प्रदर्शन कालावधीत सुमारे 80 लाखांची उलाढाल झाल्याने संयोजकांसह बचत गटांतील महिलांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना समाधान व्यक्त केले.

बचत गटांनी बनवलेल्या मुरंब्याला मोठी मागणी
करवंद, आंबा, मिरची, मिक्स, लसूण, लिंबू आदी प्रकारच्या लोणच्याबरोबर मुरंबा प्रदर्शनात उपलब्ध होता. यात आंबट-गोड व गोड-तिखट या प्रकाराचा समावेश होता. नगरकरांकडून प्रदर्शनाला अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाल्याने समाधान वाटले. पुढील वर्षीदेखील नगरच्या प्रदर्शनात येण्याची इच्छा आहे.’’ शैलेश काडगे, व्यावसायिक, सिंधुदुर्ग.