आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जमिनीचे बिघडले आरोग्य; जमिनीतील सूक्ष्म मूलद्रव्य व सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात झालीय घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रासायनिक खते व पाण्याच्या बेसुमार वापराचे दुष्परिणाम आता जिल्ह्यातील जमिनीत दिसत आहेत. जमिनीची सुपीकता उत्तरोत्तर कमी होत असून उत्पादन क्षमतेवरही विपरित परिणाम जाणवत आहे. जमिनीतील सूक्ष्म मूलद्रव्य आणि सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत असताना जमिनीचा सामू व क्षारता वाढत आहे. ही धक्कादायक बाब माती व पाणी परीक्षणातून समोर आली असून वेळीच उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामाच्या एकूण क्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्रावर उसाची लागवड आहे. ऊस वगळता एकूण क्षेत्रापैकी बावीस टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. रासायनिक खतांचा अतिवापर, पाण्याचा बेसुमार उपयोग व सेंद्रिय खतांकडे झालेल्या दुर्लक्षांमुळे दिवसेंदिवस जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करताना अंदाजित पद्धतीने पिकांना आवश्यक घटक मूलद्रव्यांचा पुरवठा केला जातो. त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, आता माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व पटू लागल्याने शेतकर्‍यांचा कल परीक्षणाकडे वाढला आहे. यातूनच जमिनीच्या सुपीकतेवर होत असलेले दुष्परिणाम पुढे आले आहेत.

मातीमध्ये तांबे, लोह, जस्त, मंगल आदी सूक्ष्म घटक असतात. या घटकांतील कमी-अधिक प्रमाणाचा उत्पन्नावर चांगला-वाईट परिणाम होतो. एखाद्या जमिनीत लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास लागवडीच्यावेळी सेंद्रिय खतांबरोबर प्रतिहेक्टरी फेरस सल्फेट (हिराकस) 25 ते 30 किलो देणे गरजेचे असते. यातून उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते. मृदा परीक्षणाबरोबरच पाणी परीक्षणही करणे महत्त्वाचे आहे. पाण्यामध्ये सामू, क्षारता, सोडिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पालाश, कार्बोनेट, बायकार्बाेनेट्स, क्लोराईड, सल्फेट्स, सोडियम शोषण गुणोत्तर, रेसिडियल सोडियम कार्बाेनेट आदी बाबी आढळून येतात. या घटकांचे प्रमाण कमी अथवा जास्त असल्यास शेतीसाठी पाण्याचा वापर योग्य अथवा अयोग्य हे ठरवण्यास मदत होते.

माती व पाणी परीक्षणासाठी कृषी विभागांतर्गत भुतकरवाडी येथे जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा आहे. जिल्हाभरातून आलेल्या शेतीतील मातीचे व पिकांसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचे नमुने या प्रयोगशाळेत तपासले जातात.

जागरूक शेतकरी माती व पाणी परीक्षण करून घेतात. यामध्ये बागायतदार व फळबागायतदारांचा अधिक भरणा असतो. 2013-2014 या वर्षासाठी मृदा सर्व्हेक्षण व चाचणी प्रयोगशाळा कार्यालयाला जिल्ह्यात 14 हजार 850 माती व पाणी नमुने तपासण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. कृषी विभागाकडून सुमारे 13 हजार 959 माती व पाणी नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले. सर्वसाधारण (साधे व विशेष) नमुने 8 हजार 517, सूक्ष्म मूलद्रव्य 4 हजार 483 आणि 959 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 2012-13 मध्ये जिल्ह्यातील 13 हजार 959 शेतकर्‍यांनी माती व पाणी नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये सर्वसाधारण तपासणी 8 हजार 517, सूक्ष्म मूलद्रव्य 4 हजार 483 व959 पाणी नमुन्यांचा यामध्ये समावेश आहे.

यावर्षी शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने 95 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. माती व पाणी नमुन्यांच्या तपासणीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनीत सर्वसाधारणपणे फेरस, झिंक, जस्त व लोह या सूक्ष्म मूलद्रव्यांची व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटल्याचे आढळले. जमिनीत 1 टक्का सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आवश्यक असते. तपासणी केलेल्या जमिनीत हे प्रमाण 0.40 ते 0.45 टक्के एवढे कमी आढळले. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे आवश्यक आहे.

जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सध्या ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशी पिकांसाठी लाभदायक ठरत आहे. ट्रायकोडर्मा बुरशी ही परजिवी बुरशी असून पिकांसाठी हानीकारक असलेल्या बुरशीवर उपजिविका करते. नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तयार होत असलेल्या ट्रायकोडर्माचा सध्या शेतकरी वापर करत आहे. तसेच ठिबक सिंचनाने पाण्याचा वापर आवश्यक आहे.
परीक्षणासाठी अल्प शुल्क
जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृद चाचणी कार्यालयात माती व पाण्याच्या सर्वसाधारण परीक्षणासाठी (प्रतिनमुना) 15 रुपये, सूक्ष्म मूलद्रव्यांसाठी (जस्त, लोह, मॅग्नेशियम, तांबे आदी) 200, विशेष परीक्षणासाठी 250, तर पाणी तपासणीसाठी 100 ते 120 रुपये शुल्क आकारण्यात येते.
अशा करा उपाययोजना
पिकांसाठी शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. क्षारता कमी करून पाण्याचा वापर आवश्यक आहे. हिरवळीच्या खतांचा व जैविक औषधांचा गरजेनुसार वापर केल्यास सुपीकता वाढण्यास मदत. गरजेनुसार फेरस सल्फेट व झिंक सल्फेटची खते वापरणे.
या घटकांची कमतरता
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घटले आहे. कर्बाचे प्रमाण एक टक्का आवश्यक असताना केवळ 0.40 ते 0.45 टक्के सेंद्रिय कर्ब आढळून आला. सूक्ष्म मूलद्रव्यांपैकी झिंक व फेरसचे प्रमाण अत्यल्प आहे. जमिनीची क्षारता व सामू वाढला आहे.
माती, पाणी परीक्षणाने उत्पादनात वाढ
रासायनिक खतांची मात्रा अधिक दिल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढते, असा शेतकर्‍यांचा समज झाला आहे. यातून रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे सध्या पशुधन घटले आहे. परिणामी सेंद्रिय खतांचे प्रमाण कमी झाले आहे. रासायनिक खतांचा अधिक वापर व सेंद्रिय खतांचा तुटवडा यामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने शेतातील माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक आहे. परीक्षणाच्या अहवालानुसार नियोजन केल्यास सुपीकता वाढून उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होते.’’
बी. एम. नितनवरे, जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी.