आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chennai Express' Saree, Latest News In Divya Marathi

चेन्नई एक्स्प्रेस’ साडीची बाजारात क्रेझ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सध्याचा जमाना फॅशन ट्रेंड व ब्रँडचा आहे. मुलींचा पेहराव पंजाबी ड्रेसकडून पूर्णपणे जिन्स व कुर्ती-टी शर्टकडे झुकला आहे, तरीही साड्यांचे महत्त्व थोडेही कमी झालेले नाही. विविध टीव्ही चॅनल्सवर सुरू असलेल्या मालिकांनी साडीची लोकप्रियता, तर टिकवलीच पण त्यात अत्यंत आकर्षकपणा व प्रचंड वैविध्य आणले आहे. ‘सून मी त्या घरची’, ‘पुढचं पाऊल’ व ‘अक्कासाहेब’ या मराठी मालिकांमधील साड्यांना महिला वर्गातून सर्वाधिक पसंती आहे. दाक्षिणात्य पद्धतीची काठा-पदराची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ साडीही आपली लोकप्रियता टिकवून आहे.
काही वर्षांपूर्वी हिंदी मालिकांत साड्यांची फॅशन ठरायची. आता बाजारात मराठी मालिकांच्या नावावरील साड्यांची मोठी धूम आहे. काहीही असले, तरी साड्यांच्या विश्वातही टीव्ही मालिकांच्या फॅशन डिझायनरचाच एकूण प्रभाव आहे. नगरचा कापडबाजार राज्यात प्रसिद्ध आहे. नवी मालिका असो वा नवा चित्रपट असो त्यात वापरण्यात येणार्‍या साड्यांना महिला मागणी करतात. पैठणीचे अजूनही महिला वर्गात मोठे आकर्षण आहे. येवला येथे तयार करण्यात येणार्‍या पैठणीला चांगली मागणी आहे. येवल्याच्या पैठणीला चांगला हातमाग वापरला जातो. दक्षिणेतूनही पैठणी येतात. मात्र, त्याला कमी प्रमाणात मागणी असते. सर्वाधिक मागणी सहावार साड्यांना आहे. नऊवार साड्यांना ग्रामीण भागातूनच मागणी असते.
कापडबाजारात बनारसी सिल्क, कोलकत्याच्या सुती व सिल्क, जामनगरच्या बांधणीच्या, बेंगळुरूच्या पारंपरिक सुती, तर सुरतच्या सिंथेटिक साड्या उपल्बध आहेत.
साड्यांबरोबरच इतरही कपड्यांची येथे विविधता असल्याने औरंगाबाद, जालना, पुणे, बीड, नाशिक, नांदेड व पुणे येथील वधू-वरांकडील मंडळी बस्ता बांधण्यासाठी नगरच्या बाजारात येतात. शहरात कापडाची मोठी दालने असली, तरी साड्यांसाठी ‘कोहिनूर’,‘सारडा’, ‘वर्धमान’, ‘सेजल’, ‘द्वारकादास श्यामकुमार’ ही पाच मोठी दालने आहेत.
वर्षाकाठी हजार कोटींची होते उलाढाल
लग्नसराईत कापड बाजारातील प्रमुख दुकानांमध्ये दररोज 10 ते 20 बस्ते बांधले जातात. साधारण सर्व दुकाने मिळून दररोज 100 ते 150 बस्ते बांधले जातात. या बस्त्यांमधून दररोज एक हजार ते दीड हजार साड्यांची विक्री होते. कापड बाजारातून वर्षाकाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते. तसेच दररोज 400 ते 500 लोकांना रोजगार उपलब्ध होतो.
सिल्कबरोबरच पारंपरिक साड्यांनाही मागणी
लेहंगा साडी, डिझायनर साडी, सिल्क, उपाडा, कादंबरी, मधुबनी, पेशवाई, कार्डियाल, न्यूडस् सिल्क, सिंथेटिक साड्यांची किंमत 1200 पासून ते 25 हजारांपर्यंतच्या या साड्या आहेत. पारंपरिक भागलपूर सिल्क, ओरिसा सिल्क व चाफा सिल्क साड्या ही विक्रीसाठी आहेत. त्याची किंमत 3800 पासून ते 22 हजारांपर्यंत आहे.