आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Executive Officer Adinath Dagade, Latest News In Divya Marathi

ध्येय निश्चित करा, यश तुमचेच- अधिकारी आदिनाथ दगडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ध्येय निश्चितीसाठी इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. ध्येय निश्चित केल्यास त्याच्या पूर्तीसाठी वाटचाल करणे अधिक सोपे होते. त्यामुळे ध्येय निश्चित करा, यश तुमचेच आहे, असा कानमंत्र आव्हाणे (ता. शेवगाव) येथील रहिवासी व आयएएस असलेले अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिनाथ दगडे यांनी रविवारी दिला. स्टडी सर्कल आणि देवाज् ग्रूपतर्फे स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार व त्यांचे अनुभव कथन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे, कुमार वाकळे, राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक गणेश बारगजे, शिर्डीचे वरिष्ठ गुप्त वार्ता विभागाचे नागेश गायवाड, धर्मादाय आयुक्त विनोद डोंगरे,स्टडी सर्कलचे संस्थापक तथा ग्राहक मंचचे न्यायाधीश विष्णू गायकवाड, लेखक चंद्रकांत गोरे, राजू अग्रवाल, नीलेश सत्रे आदी उपस्थित होते.
दगडे म्हणाले, मला आई-वडिलांसह मित्रांचे मोठे सहकार्य मिळाले. स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल, तर स्वत:वर विश्वास ठेवा, दोन वर्षे झटून अभ्यास करा आणि आयुष्यभर आनंदी जीवन जगा. ग्रामीण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मात्र, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठी धमक असते. ती धमक युपीएससीच्या माध्यमातून दाखवून द्या, म्हणजे खरा भारत हा खेड्यात आहे हे पटेल, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी इंग्रजी वर्तमान पत्रातील संपादकीय लेख वाचण्याचा सल्ला त्यांनी दिला. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी यावर त्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिंनींना मार्गदर्शन केले.
तुम्ही चांगले करू इच्छित असाल आणि त्यात नियमांचा अडथळा येत असेल, तर नियमात बदल करण्याची धमक तुमच्यात असावी. तुम्ही लोकांच्या अपेक्षा करू शकता का? पदाला न्याय दिला तरच तुम्ही उत्तम अधिकारी होऊ शकतात, असेही दगडे यावेळी म्हणाले. शिर्डीचे वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकारी गायकवाड म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने उतरा. स्वत:शी प्रामाणिक राहून अभ्यास करा, तरच यश मिळेल. कोणत्याही क्षेत्रातील घडामोडींवर लक्ष ठेवा. आज स्पर्धा परीक्षेचा ट्रेंड बदलला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांतील माहितीबाबत अष्टपैलू राहावे, असे ते म्हणाले. बारगजे यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणे देऊन स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले. लेखक गोरे म्हणाले, यावेळच्या युपीएससी परीक्षेतील दहा ते बारा गुणवंतांचा नगरशी संबंध आहे. स्टडी सर्कलमुळे नगरमध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण रुजत आहे.
उत्पादन शुल्कच्या अधीक्षक जाधव म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झोप उडायला हवी. स्वत:त आत्मविश्वास असावा. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली आई-वडिलांना वेड्यात काढू नका. स्पर्धा परीक्षेत मुलींनी पुढे यायला हवे. आपल्याला मिळालेल्या 33 टक्के आरक्षणाचा लाभ घ्यायला हवा.

नगरसेवक शिंदे म्हणाले, देवाज् ग्रूपच्या माध्यमातून शहरात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम केले. मात्र, शैक्षणिक क्षेत्रात असा उपक्रम प्रथमच घेत आहोत. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मुला-मुलींना प्रोत्साहन देऊ. त्यामुळे शहरातून जास्तीत जास्त युवक प्रशासकीय सेवेत जातील. तसेच मला संधी मिळो व न मिळो नगर शहराचा चेहरामोहरा बदलवू असे ते म्हणाले. प्रास्ताविक न्यायाधीश गायकवाड यांनी केले. यावेळी नागेश गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘भारताचे आंतरराष्‍ट्रीय संबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष यादव यांनी केले.