आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Executive Officer News In Marathi, Divya Marathi

गतिमान कारभारासाठी मुख्यालयात थांबा-मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - प्रशासकीय बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी कर्मचारी व अधिका-यांच्या निष्क्रियतेबद्दल चांगलीच कानउघाडणी केली. दैनंदिन कारभार गतिमान, पारदर्शी व परिणामकारक व्हावा यासाठी कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात थांबले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

आढावा व प्रशासकीय बैठक, तसेच तिसगाव परिसरातील ग्रामपंचायतींना अचानक भेट आटोपून नवाल यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्य योगिता राजळे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, माजी उपसभापती विष्णूपंत अकोलकर आदी उपस्थित होते.

नवाल म्हणाले, पाथर्डी तालुक्याबाबत सतत तक्रारी येत आहेत. आता दुर्लक्ष न करता कारवाईस प्रारंभ करू. कामचुकार व बेजबाबदार कर्मचा-यांनी हीच नोटीस समजावी. अशा कर्मचा-यांची माहिती संकलित करण्याचे काम पूर्ण होताच कारवाईला प्रारंभ करण्याचे संकेत नवाल यांनी दिले.पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे काम येत्या आठ दिवसांत पूर्ण करून कर्मचारी निवासस्थान व पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचा प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

नवाल यांनी प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक यांनी मासिक बैठक वगळता इतर कोणत्याही दिवशी पंचायत समिती कार्यालय, शिक्षण विभागात आढळले, तरी गटविकास अधिका-यांनी तत्काळ कारवाई करावी, असे आदेश दिले. ग्रामसेवकाने मुख्यालयात थांबलेच पाहिजे. सध्या तालुक्यात टंचाईची परिस्थिती आहे. कोणत्याही गावात पूर्वसूचना न देता आपण भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करू. शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य केंद्रे, अंगणवाडी, पशुवैद्यकीय केंद्र, पाणीपुरवठा योजनांची प्रामुख्याने पाहणी केली जाईल, असे नवाल यांनी यावेळी सांगितले.

तत्काळ प्रस्ताव पाठवा, शासनाकडे सादर करू
उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी जुन्या प्रशासकीय इमारतीला संरक्षक कठडे व कर्मचा-यांसाठी नवीन वसाहतीचे बांधकाम करावे, अशी मागणी नवाल यांच्याकडे केली. त्यावर तत्काळ प्रस्ताव पाठवावा, शासनाकडे सादर करू, असे नवाल यांनी सांगितले. गटविकास अधिकारी यशवंत सदावर्ते यांनी त्यांचे स्वागत केले.