आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिने उलटूनही शाळेला छत नाही, मेळाव्याला आलेले सीईओ शाळेकडे फिरकलेच नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जून महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे वांबोरीतील प्राथमिक शाळेचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले होते. या खोल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वांबोरीत आयोजित आनंद मेळाव्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शैलेश नवाल यांनी हजेरी लावली, पण त्यांनी शाळेला भेट दिली नाही. इतर अधिकाऱ्यांनीही नवाल यांचे लक्ष रखडलेल्या कामाकडे वेधले नाही. दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेली शाळा आणखी किती दिवस भग्नावस्थेत राहणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
वांबोरी येथील मराठी मुलांच्या शाळेची इमारत जुनी आणि जीर्ण झाली असल्याने दरवर्षी वादळाचा फटका या इमारतीला बसतो. जूनच्या पहिल्याच आठवड्यात वांबोरीसह जिल्ह्यातील काही भागात वादळी पाऊस झाला. त्यात अनेक शाळांचे पत्रे उडाले. त्यात वांबोरी येथील शाळेचाही समावेश होता. त्यावेळी सुटी असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. इमारतीसमोरील पत्र्याची पडवीही वादळात उद््ध्वस्त झाली. डाव्या बाजूच्या खोल्यांसमोरील पडवी अजूनही धोकादायक पद्धतीने लोंबकळलेल्या अवस्थेत आहे. विद्यार्थी या इमारतीच्या परिसरात बागडत असतात. पडवीतील लोंबकळलेले पत्रे कोसळून त्यांना इजा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शाळांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्याला तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी सहमती दर्शवली होती. तथापि, अद्यापही दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित साईज्योती आनंद मेळाव्यासाठी नवाल वांबोरीत आले होते. यावेळी सरपंच उदयसिंह पाटील, गटविकास अधिकारी ई. एन. शेळकंदे, ग्रामसेवक बाळासाहेब गागरे, संगीता दुशिंग, अजित पटारे, अमोल वारुळे, रेखा ढोकणे आदी उपस्थित होते. यावेळी नवाल म्हणाले, महिला चांगल्याप्रकारे घर चालवतात. त्या समाजातही बदल घडवू शकतात. बचतगटातील प्रत्येकाकडे शौचालय हवे. हे झाल्यानंतर आपण निर्मल आनंद मेळावा आयोजित करू, असे त्यांनी सांगितले. बचतगट चालक संजना लोखंडे यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सरपंच पाटील म्हणाले, बचतगटांच्या माध्यमातून लोखंडे यांनी केलेल्या उत्कर्षाचा आदर्श महिलांनी घ्यावा. बचतगट म्हणजेच आर्थिक सक्षमीकरणापलीकडे जाणे असा असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर नवाल यांनी आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली, पण तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्राथमिक शाळेकडे त्यांची पावले वळली नाहीत. विशेष म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांसह तालुक्यातील काही अधिकाऱ्यांनीही नवाल यांचे लक्ष शाळेकडे वेधले नाही. सर्वांनीच आळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली.

निविदेचा घोळ सुरूच
शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने निधीची तरतूद केली होती. वांबोरीतील शाळेच्या दुरुस्तीसाठी ९ लाख ६० हजार मंजूर आहेत. तथापि, पाच लाखांहून अधिक खर्च असल्याने निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने निधी वर्ग केला असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगितले, परंतु बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शाळेचा जीर्णोद्धार झाला नाही.