आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Taking Resiganation From Shrigonda Corporator

श्रीगोंदाच्या नगरसेवकाला मुख्‍यमंत्र्यांनी केले बडतर्फ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्यातील नगरसेवक अख्तर शेख यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नगरसेवक पदावरून शुक्रवारी सायंकाळी बडतर्फ केले. तसेच पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांनी शेख यांच्याविरुद्ध केलेल्या विविध तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली.

नगरसेवक अख्तर शेख यांनी 1997 साली त्यांचे व कुटुंबीयांचे नाव दारिद्रयरेषेच्या यादीत समाविष्ट केले. दारिद्रय़ रेषेच्या निकषात बसत नसताना शेख यांनी या योजनेचा लाभ कुटुंबीयांना मिळवून दिला. त्यामुळे त्यांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष बोरुडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांच्याकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन शेख यांचे नाव या यादीतून वगळले गेले. त्यानंतर बोरुडे यांनी नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शेख यांनी पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप करीत त्यांना पदावरून बडतर्फ करण्याची व निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी 26 नोव्हेंबर 2012 रोजी मंत्रालयात या प्रकरणाची सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंना म्हणणे मांडण्याची संधी दिली. या सुनावणीचा निकाल शुक्रवारी (12) रोजी लागला. मुख्यमंत्री चव्हाण यांनी या प्रकरणाचे निकालपत्र व बडतर्फीचा दिलेला आदेश श्रीगोंदे पालिकेस प्राप्त झाला. दरम्यान, या निर्णयाची चाहूल आधीच लागल्याने शेख विरोधी गटाने शहरात मोठा जल्लोष केला. अनेकांनी पेढे वाटले. एकेकाळी शेख यांच्यासोबत असणार्‍या एका कार्यकर्त्याने, तर पेढय़ाऐवजी चक्क फुटाने वाटून आगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या गटास धक्का बसला आहे. या निर्णयामुळे श्रीगोंद्यातील राजकीय संघर्षाला आता नवीन धार येणार असल्याचे राजकीय सुत्रांनी सांगितले.
अखेर न्याय मिळाला
अनेक वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. सरकार कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका करावी लागली होती. न्यायालयाने सरकारला दिलेल्या कालावधीत देखील कारवाई झाली नव्हती. परंतु अखेर आपणास न्याय मिळाला.’’ नंदकुमार बोरुडे, माजी नगराध्यक्ष, श्रीगोंदे.
कायदेशीर दाद मागणार
राज्य सरकारने आपणावर केलेल्या कारवाई प्रश्नी कायदेशीर दाद मागणार आहोत. ही कारवाई अन्यायकारक आहे. आपण पदाचा गैरवापर केलेला नाही. तसेच दारिद्रय़ रेषेखालील योजनेचा वैयक्तिक लाभदेखील घेतलेला नव्हता. सूडबुद्धीने माझ्याविरुद्ध खोटी तक्रार करण्यात आली होती. ’’ अख्तर शेख, नगरसेवक.