आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा ठरली औपचारिकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गुरुवारी झालेला जिल्हा दौरा केवळ औपचारिकता ठरली.स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रवेश न देता घेतलेल्या प्रशासकीय बैठकीत जिल्ह्यासाठी कोणताही ठोस निर्णय झाला नाही. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी आखलेल्या व्यूहरचनेमुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा निष्फळ ठरल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे.

जिल्ह्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 325 जनावरांच्या छावण्या व 510 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री जर रोजच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकार्‍यांच्या सातत्याने संपर्कात होते, तर स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून फक्त अधिकार्‍यांची बैठक कशासाठी घेतली, असा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींमधून उपस्थित होत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधीच काय, पण पत्रकारांनाही बैठकीस मज्जाव करण्यात आला. फक्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांना बैठकीत बसण्याची संधी मिळाली.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी कोणत्याही विशेष उपाययोजनेची घोषणा केली नाही. लोकप्रतिनिधींच्या प्रo्नांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन देत त्यांची बोळवण करण्यात आली. या बैठकीत दुष्काळग्रस्तांच्या हाती ठोस काहीही पडू शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचे काही आमदारांचे म्हणणे आहे.

यापूर्वी झालेल्या प्रत्येक बैठकीत पालकमंत्री पाचपुते हे दुष्काळी उपाययोजनात दुजाभाव करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांनीही असाच सूर आळवला आहे. प्रशासनही पाचपुते यांच्या इशार्‍यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचे कारण पुढे करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केली होती. तथापि, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत असा कोणताही मुद्दाच उपस्थित होऊ शकला नाही. पालकमंत्री पाचपुते यांनी आखलेल्या व्यूहरचनेमुळे काँग्रेस पदाधिकार्‍यांचे साधे म्हणणेही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. एकूणच पालकमंत्री पाचपुते यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांची खेळी त्यांच्यावर उलटवण्यात यशस्वी ठरले.


दुष्काळाचे गांभीर्य नाही
मुख्यमंत्री फक्त देवदर्शनासाठीच जिल्ह्यात आले होते. विरोधकांकडून आरोप होऊ नयेत, म्हणून त्यांनी टंचाई आढावा बैठकीचा फार्स केला. दुष्काळाचे गांभीर्य असते, तर त्यांनी लोकप्रतिनिधींनाही बैठकीसाठी बोलावले असते. पण, तसे झाले नाही. लोकप्रतिनिधींनी दुष्काळाची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली असती. पण बैठकीत आपले पितळ उघडे पडेल अशी भीती त्यांना वाटली असावी. एकूणच मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे गांभीर्यही नाही अन् काही करण्याची इच्छाशक्तीही नाही, हेच या दौर्‍यातून दिसून आले.’’ शिवाजी कर्डिले, आमदार, भाजप


म्हणणे ऐकणे आवश्यक होते..
जनतेच्या प्रश्नांवर जर टंचाई बैठक घ्यायची होती, तर लोकप्रतिनिधी व पत्रकारांना बोलावणे आवश्यक होते. बर्‍याचदा प्रशासकीय यंत्रणा टंचाईवर उपाययोजना करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत. त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. ’’ शंकरराव गडाख, आमदार, राष्ट्रवादी


ही तर औपचारिकता
जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मुख्यमंत्री जिल्हा दौर्‍यावर आले, पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. त्यांनी केवळ औपचारिकता म्हणून जिल्ह्याला भेट दिली. ’’ राम शिंदे, आमदार, भाजप


हाती काहीच लागले नाही
एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला यावे, तसे मुख्यमंत्री जिल्हा दौर्‍यावर आले. ज्यांच्यासाठी हा दौरा आयोजित केला, त्यांना न भेटताच त्यांनी दुष्काळग्रस्तांना परमेश्वराच्या हवाली केले. त्यांच्या या दौर्‍यातून दुष्काळग्रस्तांच्या हाती काहीच लागले नाही.’’ सबाजी गायकवाड, शेतकरी