आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीमिश्रित चिक्की; अण्णाही घालणार लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मातीमिश्रित राजगिरा चिक्की प्रकरणावरून नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी रान उठवल्यानंतर हा विषय राज्यभरात गाजला. या चिक्कीचे दोन प्रयोगशाळेतील नमुने योग्य आले आहेत. पण जिल्हा परिषदेने या ठरावावरच संशय व्यक्त केला आहे. कार्ले यांनी थेट जनतेलाच ही चिक्की खाण्याचे आवाहन करून अभिप्राय नोंदवले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आता या चिक्कीचे नमुने दाखवण्याची तयारी कार्ले यांनी सुरू केली आहे.

अंगणवाडीतील बालकांना वाटप केली जाणारी सूर्यकांता चिक्की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील सूर्यकांता संस्थेने पुरवली आहे. पण जिल्ह्यात सूर्यकांता राजगिरा चिक्कीत रेती असल्याचे सर्वप्रथम संदेश कार्ले यांनी जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आणून दिले.

राजगिरा चिक्कीत मातीच असल्याचे पदाधिकारी अधिका-यांनी मान्य केल्यानंतर प्रकल्पस्तरावर होणारा चिक्कीचा पुरवठा थांबवण्यात आला. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेतही चिक्कीत माती असल्याने शासकीय प्रयोगशाळांबरोबरच खासगी ठिकाणीही तपासणी करण्याचा ठराव घेण्यात आला. त्याचवेळी शासकीय प्रयोगशाळांचा तपासणी अहवाल मॅनेज होईल, असे सदस्यांचे म्हणणे होते.

काही दिवसांपूर्वीच चिक्की तपासणीचे दोन्ही अहवाल चांगले आल्याने चिक्कीला क्लीन चिट मिळाली. पण अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी अहवाल काहीही असला तरी चिक्की वाटप करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कार्ले यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सूर्यकांता चिक्कीचा प्रयोग थेट जनतेवर केला. त्यावेळी अनके नागरिकांनी चिक्कीत माती असल्याचा लेखी दुजोरा दिला. त्यामुळे चिक्कीत माती असताना प्रयोगशाळेने क्लीन चिट दिलीच कशी असा प्रश्न आहे. हा प्रश्न राज्यस्तरावरही चर्चेचा बनला असतानाच कार्ले यांनी चिक्कीसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शासनालाही याप्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. पुरवठादारावर कारवाई व्हावी, अशी कार्ले यांची मागणी आहे, पण प्रयोगशाळेतून क्लीन चिट मिळत असल्याने पुरवठादारावर कारवाई करता येणार नाही. त्यातच महिला बालकल्याण समितीनेही राज्यस्तरावरून खाद्यपदार्थ खरेदी करण्यास विरोध करून जिल्हास्तरावरच खरेदीची मागणी केली आहे. त्यामुळे चिक्कीचे प्रकरण अजूनही थंड व्हायला तयार नाही.

चिक्कीचा पुरवठा बंद असतानाही जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांत चिक्कीचे वाटप सुरू आहे. अण्णादेखील या प्रकरणात लक्ष घालणार असल्याने जबाबदार यंत्रणेचेही धाबे दणाणले आहेत.

इतर अहवालांकडे लक्ष
चिक्कीच्यादोन नमुन्यांचा अहवाल चांगला आला असल्याने आता खासगी प्रयोग शाळेत पाठवलेल्या नमुन्यांच्या अहवालाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे. अन्न औषध प्रशासनानेही या चिक्कीचे नमुने घेतले होते. पण अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी पी. बी. भोसले यांसंदर्भात माहिती देण्यास नकार देत आहेत.

राहुरीत चिक्कीचे वाटप
चिक्कीचापुरवठा बंद करण्यात आला असताना राहुरी तालुक्यातील काही अंगणवाड्यांमध्ये सूर्यकांता चिक्कीचे वाटप सुरू आहे. जिल्हा परिषदेने ठराव घेऊन हे वाटप थांबवले आहे. असे असतानाही बालकांना ही चिक्की वाटप केली जात असल्याने अधिका-यांची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आली आहे.

अण्णा हजारे यांनी बोलावले आहे
चिक्कीप्रकरणीजबाबदारांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्थानिक सहका-यांनी फोन करून माती मिश्रित चिक्कीचे नमुने मागवले आहेत. अण्णांचा निरोप असल्याने मी त्यांची भेट घेण्यासाठी जाणार असून त्यांचेही लक्ष वेधणार आहे.'' संदेशकार्ले, सभापती,पंचायत समिती.