आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिक्की घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यपातळीवर चिक्कीप्रकरण गाजत असताना जिल्हा परिषद स्तरावर हा विषय थंड बस्त्यात गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकरणावरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्यावरच सोमवारी तोफ डागली. चिक्कीप्रकरणी कारवाईत अध्यक्षांनी पुढाकार घेणे अपेक्षित असताना काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला. नंतर शिवसेना राष्ट्रवादीने श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप शेलार यांनी केल्याने सत्ताधाऱ्यांमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
अंगणवाडीतील बालकांना चिक्की वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील सूर्यकांता संस्थेला चिक्की पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला. जिल्ह्यासाठी सुमारे लाख ७७ हजार चिक्की पाकिटांचा पुरवठा करण्यात आला. वाटण्यात आलेल्या राजगिरा चिक्कीत मोठ्या प्रमाणात माती आढळून आली. हा प्रकार नगर जिल्ह्यातील वर्तमानपत्रांनी प्रथम उघडकीस आणल्यानंतर तातडीने प्रकल्पस्तरावरील चिक्कीचे अंगणवाड्यांना केले जाणारे वाटप थांबवण्यात आले. राजगिरा चिक्कीचे वजन वाढवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक त्यात माती मिसळण्यात आल्याचा आरोपही काही लोकप्रतिनिधींनी केला. नंतर हे प्रकरण राज्यभर गाजले.

चिक्कीप्रकरणावरून मंत्री पंकजा मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. जिल्हा परिषदेत मातीमिश्रित चिक्की वाटप झाल्याचे समोर आले. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सोयीस्कर मौन का पाळले, असा आरोप होत आहे.

यासंदर्भात शेलार म्हणाले, जिल्हा परिषदेत काँग्रेसने चिक्कीप्रकरणाचा पाठपुरावा केला. एकमेकांना नावे ठेवण्यापेक्षा ज्या बालकांना मातीमिश्रित चिक्की खाऊ घातली, त्यांच्या जीवाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पुढाकार घेऊन चिक्कीचा साठा सील करण्यास भाग पाडलेे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत काँग्रेसने सर्वप्रथम पुढाकार घेऊन प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादीने चिक्कीतील मातीमिश्रणाचा प्रकार समोर मांडला.

आता कोणीही या प्रकरणात श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे अाहे. त्यांनीच या प्रकरणात पुढाकार घेणे अपेक्षित होते. पण अध्यक्ष गुंड यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला नाही. आम्हीच आग्रह धरून चिक्कीचे नमुने तपासणीसाठी पाठवले. या प्रकरणात सुरुवातीपासून काँग्रेस पाठपुरावा करीत आहे, असेही शेलार यांनी सांगितले.

चिक्कीत माती असल्याचे प्रकरण कोणी उघडकीस आणले, याचे श्रेय लाटण्यासाठी आता काँग्रेसही रिंगणात उतरली आहे. काँग्रेसने चिक्कीप्रकरणी फारशी आक्रमक भूमिका घेतली नसल्याचा प्रश्न विचारला असता शेलार यांनी थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्यावरच टीकास्त्र सोडले.