आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालकलावंत निहारची भूमिका असलेला चित्रपट उद्या प्रदर्शित; ‘एक व्हिलन’मध्ये साकारली रितेशच्या मुलाची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सात वर्षांचा बाल कलाकार निहार गिते याची भूमिका असलेला ‘एक व्हिलन’ हा चित्रपट 27 जून रोजी नगरमधील माय सिनेमा व आशा स्क्वेअरमध्ये प्रदर्शित होत आहे.
बालाजी टेलिफिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटात निहारने अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री अमना शरीफ यांच्या मनीष या छोट्या मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘आशिकी 2’ फेम मोहित सुरी यांनी केले. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, गोवा, मॉरिशस, हैदराबाद व दक्षिण आफ्रिकेत झाले.

निहार हा शिर्डी येथील कलाशिक्षक हेमंत व कल्पना गिते यांचा मुलगा असून सध्या तो शिर्डीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो. दीड-दोन वर्षांचा असताना त्याने टीव्हीवरील एका जाहिरातीची नक्कल घरात करून दाखवली, तेव्हाच त्याच्यात कलावंत दडलेला असल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या मुलाच्या कलागुणांना वाव देण्याचे ठरवले. नर्सरीत शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत निहारने साकारलेल्या बाल शिवाजीने प्रथम क्रमांक मिळवला. नंतर नृत्य, नाट्य, अभिनय, मिमिक्री अशा अनेक कार्यक्रमांत भाग घेऊन त्याने बक्षिसे पटकावली.

निहारकडे अभिनय, नृत्य, मिमिक्री, सूत्रसंचालन याबरोबरच चित्रकलेचेही उपजत कलागुण आहेत. 2012 मध्ये त्याने गणपतीची 500 विविध रुपे रेखाटली. त्याची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली.

ग्लॅमरच्या दुनियेत वावरत असला, तर निहारचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेले नाही. चित्रीकरणामुळे राहिलेला अभ्यास परत आल्यानंतर तो पूर्ण करतो. निहारच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी व त्याच्या चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी 29 जून रोजी दुपारी 3 वाजता माय सिनेमा चित्रपटगृहात नगरकरांच्या वतीने त्याचा सत्कार केला जाणार आहे.
मिथुनदांची नक्कल
झी टीव्हीवरील ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स का टशन’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही काम करण्याची संधी निहारला मिळाली. ग्रँडमास्टर मिथुन चक्रवर्ती, कोरिओग्राफर अहमद खान, गीता कपूर आणि कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ऋत्विक धनजानीबरोबर त्याने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या रिअ‍ॅलिटी शोमुळे त्याला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. एकदा, तर मिथुनदाच्या गैरहजेरीत त्याने त्यांच्या हॉट सिटवर बसून त्यांची नामी नक्कल करत शाबासकीही मिळविली. याच काळात त्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची मुलाखतही घेतली.