आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या दप्तराचे ओझे होणार हलके.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शहरातील काही शाळांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच आठवड्यातून ‘एक दिवस दप्तराविना’ शाळा हा उपक्रम या शाळांमध्ये राबवण्यात येईल. शहरातील सर्वांत मोठी शिक्षणसंस्था असलेल्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी पाच दिवस अभ्यास, तर एक दिवस दप्तराविना संगीत व खेळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंगळवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने हाती घेतलेल्या अभियानाला पहिले यश मिळाले आहे.
शहरातील हजारो शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे वाढत आहे. ते कमी करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन मोजले, त्यामागील कारणे जाणून घेतली. दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली. त्यानंतर ‘मुलांच्या पाठीवर पालकांच्या दुराग्रहाचे ओझे’ असे वृत्त मंगळवारी प्रसिध्द करण्यात आले. शहरातील विविध शाळा, संस्थाचालक, तसेच पालकांनी त्याची दखल घेतली.
काही शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकारही घेतला. सावेडीतील रेणावीकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका जोशी यांनी लवकरच दर शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले. बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश गरड यांनीही असा उपक्रम सुरू करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ‘दिव्य मराठी’च्या अभियानाला पहिले यश मिळाले आहे.
मुलांच्या पाठीवर दप्तराचे कमीत कमी ओझे असावे, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, शहरातील बहुतांश शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. विशेष म्हणजे पालकांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढत आहे. स्पध्रेच्या युगात आपला पाल्य सर्वांच्या पुढे असावा, या भ्रमात पालक अनावश्यक शालेय साहित्य मुलांच्या दप्तरात भरतात. त्यामुळे पहिली ते चौथीच्या मुलांना बागडण्याच्या वयातच आठ ते दहा किलोंच्या दप्तराचे ओझे वागवावे लागते. हे ओझे कमी करण्यासाठी व आनंददायी शिक्षण ही संकल्पना रुजवण्यासाठीच ‘दिव्य मराठी’ने हे अभियान हाती घेतले आहे.
इम्पॅक्ट
इंग्रजी माध्यमाच्या शाळा पुढेच..
‘दिव्य मराठी’ने मंगळवारी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पाहणी केली. या शाळा दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. ‘इंडस् वर्ल्ड स्कूल’मध्ये दप्तराची काटेकोर तपासणी होते. अतिरिक्त भार राहणार नाही, याची काळजी घेण्यात येते. आठवड्यातून एक दिवस केवळ विविध खेळ व संगीत शिकवले जात असल्याचे मुख्याध्यापक विवेक गिते यांनी सांगितले. आनंददायी शिक्षण ही संकल्पना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये खर्‍या अर्थाने रुजली असल्याचे यावरून स्पष्ट होते.
सर्व शाळांना सूचना देणार
शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या पाठीवर कमीत कमी दप्तर असणे आवश्यक आहे. याबाबत शहरातील सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे दप्तर शिक्षकांनी तपासले पाहिजे, तसेच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेने पालकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये याविषयी जागृती केली, तर एक दिवस दप्तराविना शाळा, हा उपक्रम प्रत्येक शाळेला राबवता येईल. त्याचे स्वागतच आहे.’’ दिलीप गोविंद, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग.
पालकांनी पुढाकार घ्यावा
आठवड्यातून एक दिवस दप्तराविना शाळा हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी राबवला होता. परंतु पालकांच्या विरोधामुळे तो बंद करावा लागला. आता पालकांना विश्वासात घेऊन पुन्हा तो सुरू करण्यात येणार आहे. मुलांना एक दिवस दप्तराविना शाळेत येता आले, तर आनंददायी शिक्षण ही संकल्पना अधिक मजबूत होईल. पालकांनी पुढाकार घेतला, तर हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येईल.’’ प्रकाश गरड, मुख्याध्यापक, बाई इचरजबाई फिरोदिया प्रशाला.
दर शनिवारी दप्तराविना शाळा
मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी दर शनिवारी दप्तराविना शाळा असा उपक्रम लवकरच सुरू करणार आहोत. त्यात पालक, शालेय समितीचे पदाधिकारी व शासनाच्या धोरणांचा विचार करण्यात येईल. आनंददायी शिक्षण हाच शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे. तो अधिक भक्कम करण्यासाठी एक दिवस दप्तराविना शाळा हा उपक्रम प्रत्येक शाळेने राबवणे गरजेचे आहे.’’ अलका जोशी, मुख्याध्यापिका, रेणावीकर विद्यालय.
एक शिक्षकी पध्दत बंद करावी
पहिली ते चौथीच्या मुलांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक असल्याने मुलांना सर्व विषयांचे दप्तर शाळेत आणावे लागते. ही पध्दत काळानुरूप बदलण्याची आवश्यकता आहे. शासन, पालक व शैक्षणिक संस्थांनी समन्वय साधून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यात शिक्षणतज्ज्ञांचाही सहभाग असावा. शासनाने धोरणात्मक बदल केला, तर दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न कायमचा सुटेल.’’ डी. आर. कुलकर्णी, अध्यक्ष, र्शीसर्मथ विद्या प्रसारक मंडळ.
दप्तराविना शाळा उपक्रम सुरू करणार
पहिली ते चौथीसाठी एक शिक्षकी पध्दत असली, तरी संस्थेने स्वखर्चाने तीन शिक्षकांची नेमणूक केली आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदाच गृहपाठ देण्यात येतो. वेळापत्रकानुसार मुले दप्तर आणतात, तरीदेखील आठवड्यातून एक दिवस दप्तराविना शाळा हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मुख्याध्यापकांशी चर्चा करून हा उपक्रम सुरू करण्यात येईल.’’ छायाताई फिरोदिया, प्रमुख कार्यवाह, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी