आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालकांच्या हितासाठी परवानाराज हटवा, बालविकासमंत्री मनेका गांधी यांच्याकडे मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वंचित बालकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महिला व बालविकास क्षेत्रातील परवानाराज हटवावे, अशी मागणी राज्यातील महिला व बालसेवी संस्थांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याकडे केली. केवळ परवाने मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाच द्यावी लागत असल्याने हजारो बालके संस्थात्मक आधार व हक्करक्षणापासून वंचित राहत असल्याचे वास्तव त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
लालबत्ती भागात काम करणाऱ्या स्नेहालय (नगर), प्रेरणा (मुंबई), चैतन्य (पुणे), परिवर्तन (ठाणे), मुक्ती (मराठवाडा), स्वयंसेवी महिला मंडळ (लातूर), प्रयास (विदर्भ) या संस्थांच्या प्रतिनिधींना मनेका गांधी यांनी संवादासाठी पुण्यात बोलवले होते. सामाजिक सहयोग तसेच युवा शक्तीच्या माध्यमातून शोषित बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्याबाबत या संस्थांचे अनुभवसिद्ध उपाय त्यांनी जाणून घेतले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. गिरीश कुलकर्णी, ज्योती पठानिया, प्रीती पाटकर, स्मिता परचुरे, ज्योती पाटकर, सुमन त्रिभुवन, शालन शिंदे आदी सहभागी झाल्या. महाराष्ट्रातील बालहक्कांची सद्य:स्थिती व प्रस्‍तावित उपाययोजनेचा आराखडा या संस्थांच्या वतीने गांधी यांना सादर करण्यात आला. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यात बाल कल्याण समित्या, बालगृहे, पोलिस व शासन यंत्रणा यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि संवेदनशीलता आणण्याच्या प्रस्तावित योजनांसंबंधी गांधी यांनी यावेळी माहिती दिली. देशातील सर्व राज्यांत बालहक्क आयोगांचे कामकाज प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.