नगर- नगर शहर लवकरच बालकामगार मुक्त करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरुवारी दिले. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त अहमदनगर चाईल्डलाइन व कामगार विभाग अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी प्रभातफेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून झाली. या फेरीला कवडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी कामगार कार्यालयातील अधिकारी वाघ, स्नेहालयचे संस्थापक सुवालाल शिंगवी उपस्थित होते. या प्रभातफेरीमध्ये स्नेहालय व शहरातील सेवा वस्त्यांमधील सुमारे 300 बालके सहभागी झाले होते. लेझीम पथक व ‘बालकामगार’ या विषयावर नाटक सादर करण्यात आले. ही प्रभातफेरी धरती चौक, कापड बाजार, चितळे रोडमार्गे, प्रगत विद्यालय येथे आली.
प्रभातफेरीत बालकामगार या विषयावर आधारित स्नेहालय संचलित बालभवनच्या विद्यार्थ्यांनी जिवंत देखावे सादर केले. समारोप कार्यक्रमाला सनफार्मा कंपनीचे कैलास गुरव, एल अँड टी कंपनीचे नागेश आढाव, सुखदेव निमसे, सहायक कामगार अधिकारी वाघ, स्नेहालय संस्थेचे अंबादास चव्हाण, आदी उपस्थित होते.स्नेहालयच्या विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून बालकामगार मुलांवर होणारा अत्याचार दाखवला. पाहुण्यांच्या हस्ते बालकांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. यशस्विततेसाठी चाईल्डलाइनचे हनिफ शेख, कुंदन पठारे, शाहीद शेख, अलिम पठाण, संतोष गव्हाणे, पूजा मेढे, अमोल धावडे, शबाना शेख, संदीप क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले.