आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत महिलेच्या कुशीतून मूल पळवले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आलेल्या इंदूर (मध्य प्रदेश) येथील संगीता जगदीश राठोड यांच्या सात महिन्यांच्या बालकाची गुरुवारी रात्री चोरी झाली. तीन मुलींच्या पाठीवर या दांपत्याला हे पुत्ररत्न झाले होते. मंदिर परिसरात हा प्रकार घडला.

संगीता राठोड (35, बिजलपूर, इंदूर) मुस्कान, मनीषा व तृप्ती या तीन मुली व मुलगा विराट (7 महिने), वडील रसाल पवार, बहीण पूनम यांच्यासह 16 एप्रिलला शिर्डीत आल्या. संगीताचा पती ट्रकचालक असून तो या सर्वांना घरी घेऊन जाणार होता. हे कुटुंब दिवसभर शिर्डीत फिरून रात्री जुन्या साईप्रसादजवळ लाडू काउंटर परिसरातील मोकळ्या जागेत झोपले. रात्री 11 वाजता संगीताने विराटला दूध पाजून आपल्याजवळ झोपवले. अर्धा-एक तासाने जाग आली तेव्हा मुलगा पुढ्यात नसल्याचे लक्षात आले. संगीताने तातडीने पोलिस स्टेशन गाठले. 25 पोलिसांनी या कुटुंबाला बरोबर घेऊन मंदिर परिसर, रेल्वे व बसस्थानक आदी भाग पिंजून काढला. मात्र, मुलाचा शोध लागला नाही.

शुक्रवारी सकाळी शिर्डी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. तीन मुलींनंतर झालेला मुलगा हरवल्याने आई संगीताने केलेला आक्रोश काळीज हेलावणारा होता. पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बत्तीसे, ससाणे तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरा नाही
शिर्डीतील बहुतेक हॉटेल, लॉजमध्ये क्लोज सर्किट टीव्ही आहेत. मात्र, साईबाबा संस्थानने मंदिर परिसर वगळता धर्मशाळा, प्रसादालय व वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसवलेले नाहीत. त्यामुळे या बालकाचा शोध घेणे कठीण झाले आहे.