आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाइल्ड लाइनमुळे ३६०० बालकांना न्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अडचणीत सापडलेल्या बालकांसाठी काम करणाऱ्या चाइल्डलाइनने जिल्ह्यातील ३६०० बालकांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. बालकामगार, बालविवाह, लैंगिक अत्याचार, आजारी, तसेच एडस‌्बाधित, बालभिकारी आदी विविध प्रकरणे संस्थेने हाताळली. बालकांसाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत संस्थेने व्यक्त केली आहे.

शासनाकडून बालकामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सकडून टाकण्यात आलेल्या छाप्यांत एकही बालकामगार सापडला नसल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, संस्थेने आतापर्यंत ६५ बालकामगारांची मुक्तता केली आहे. बालकामगारांच्या वयाबाबत शासनाकडूनच संभ्रम निर्माण करण्यात येतो. शासनाने १४ वर्षांखालील बालकांना बालकामगार ठरवले आहे, तर २००० च्या बाल अधिनियमानुसार १८ वर्षंाखालील बालकांना बालकामगार संबोधले आहे. संस्थेने आतापर्यंत ७० बालविवाहाच्या केसेस केल्या. ग्रामपंचायत सदस्य व शासकीय कर्मचाऱ्यांनी ठरवले, तर बालविवाहाचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणणे शक्य आहे. मात्र, गावातील प्रतिष्ठितच बालविवाह रोखणाऱ्या संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, असा चाइल्डलाइनचा अनुभव आहे.

सरकारी विभाग, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी जबाबदारीने भूमिका पार पाडल्यास बालकांची समस्यांतून मुक्तता होऊ शकते. बालकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अडचणीत सापडलेल्या बालकांसंबंधी चाइल्डलाइनशी १०९८ या टोल फ्री किंवा ९०११०२६४९५ या कार्यालयाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे समन्वयक कुंदन पठारे यांनी केले आहे.