आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"चाइल्ड लाइनसे दोस्ती' सप्ताहाला उत्साहात सुरुवात; चाइल्डलाइन स्वयंसेवी संस्थेचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- चाइल्ड लाइन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून "चाइल्ड लाइनसे दोस्ती' सप्ताहास गुरुवारपासून (6 नोव्हेंबर) सुरुवात झाली. बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांशी बालकांचा स्नेह वाढावा, या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या माध्यमातून विविध झोपडपट्ट्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरातील वंचित मुलांना एकत्रित करून त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहानिमित्त करण्यात आले आहे. गुरुवारी स्नेहालयाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील 40 बालकांना सोलापूर रस्त्यावरील लष्कराचे रणगाडा संग्रहालय दाखवण्यात आले. संग्रहालयातील विविध रणगाड्यांची माहिती त्यांना देण्यात आली. संग्रहालय पाहून बालके हरखून गेली. रणगाड्यांबरोबर अनेक मुलांनी आपली छायाचित्रे काढून घेतली. सिद्धार्थनगर, लालटाकी भागातील मुलांना एकत्र करून त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन सप्ताहानिमित्त करण्यात आले. बालकामगार, बालभिक्षूक, अडचणीतील मुले अशा विषयांवर मुलांना चित्र काढण्यास सांगण्यात आले. या स्पर्धेला मुलांनी भरभरून प्रतिसाद देत आशयपूर्ण चित्रे रेखाटली.

प्रेस क्लब व रोटरी क्लबच्या सहकार्याने 14 नोव्हेंबरला अप्पू हत्ती चौकातील पंडित नेहरु पुतळ्याजवळ ३०० बालकांच्या उपस्थितीत बालदिन साजरा करण्यात येणार आहे.संस्थेचे समन्वयक कुंदन पठारे, सुनील मोहिते, शाहीद शेख, वृषाली भालेराव, संतोष गव्हाणे, आलीम पठाण, पूजा मेढे, शबाना शेख हे कार्यकर्ते सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.