आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षानिमित्त बालचमूने राबवले स्वच्छता अभियान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नववर्षाची सुरुवात प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने केली. बालचमूने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पुढाकार घेत सिद्धिबाग मध्यवर्ती बसस्थानक परिसराची स्वच्छता केली. 
 
मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येकाने स्वतःसाठी जरी स्वच्छता केली, तरी ही अस्वच्छता दूर होऊ शकेल, असा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना पटवून दिले. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवताना काही ठिकाणी फक्त फोटोसाठीच राबवले गेले असल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार स्वयंस्फूर्तीने पियुष काशिद, सोहम रसाळ, सम्यक मुनोत, देवांष झंवर, श्रीवर्धन रसाळ, माधुरी शिर्के, सार्थक मुनोत, नामदेव खर्डे, सानिका गोंगे, साक्षी गोंगे, दीप शिर्के या मुलांनी सिद्धिबाग, तसेच मध्यवर्ती बसस्थानकाची स्वच्छता केली. ज्या ठिकाणी स्वच्छता केली जाते, त्याच ठिकाणी काही वेळात पुन्हा कचरा साठतो. ही चित्र बदलण्यासाठी प्रत्येकाने आता या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हायला हवे. या मुलांना सेंट मायकलच्या प्राचार्या डिसुझा यांचे प्रोत्साहन मिळाले. सिद्धिबागेत फिरण्यासाठी आलेल्यांनी तेथेच कागदे इतर कचरा फेकून दिला होता. हा कचरा या मुलांनी उचलून बागेची स्वच्छता केली, तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तर घाणीचा कळसच झाला होता. ठिकठिकाणी कचरा पडला होता. विद्यार्थ्यांनी या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतल्यानंतर त्यांना नागरिकांनी साथ दिली. स्वच्छतेचे एक ना अनेक फायदे असून, हे फायदे मिळवायचे असतील, तर स्वच्छता करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जर हे बालचमू प्रतिसाद देत असतील, स्वच्छतेचे महत्त्व त्यांना पटले असेल, स्वतः होऊन कृती करण्यास ते तयार असतील, तर तुम्ही का नाही? याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे. भावी पिढीसाठी निदान या मोहिमेत सहभागी व्हा, स्वच्छता करा, स्वच्छता ठेवा, असा संदेश यावेळी बालचमूंनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...