आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा संकलन केंद्र हलवण्यासाठी चिमुकल्यांनी केला रास्ता रोको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माळीवाड्यातील महापालिकेच्या मोटार गॅरेजजवळ असलेले कचरा संकलन केंद्र दुसरीकडे हलवावे, या मागणीसाठी भाऊसाहेब फिरोदिया सविता फिरोदिया शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही हे कचरा संकलन केंद्र हलवण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनी रास्ता रोको केला. येत्या पंधरा दिवसांत हे केंद्र दुसरीकडे हलवण्याचे आश्वासन महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिले. 
 
शहरातील जमा झालेला कचरा माळीवाड्यातील या कचरा संकलन केंद्रातून बुरूडगाव येथील कचरा डेपोत पाठवला जातो. दिवसभर वाहने तेथे उभी असतात. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात कचरा टाकला जातो. कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेला असतो. त्यामुळे परिसरात नेहमीच मोठी दुर्गंधी असते. जवळच भाऊसाहेब फिरोदिया सविता फिरोदिया शाळा आहेत. शाळेत जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दररोज कचऱ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही हे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे हलवण्यात आलेले नाही. चार महिन्यांपूर्वीच परिसरातील नागरिकांनी महापालिकेला निवेदन दिले होते. प्रत्येक वेळी खोटी आश्वासने देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांसह रास्ता रोको करून महापालिकेचा निषेध नोंदवला. 

विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केल्याचे समजताच आरोग्याधिकारी डॉ. बोरगे यांनी आंदाेलकांशी चर्चा केली. निवेदन स्वीकारून येत्या पंधरा दिवसांत कचरा संकलन केंद्र दुसरीकडे हलवण्यात येईल, असे आश्वासन डॉ. बोरगे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख, उबेद शेख, दीपक सूळ आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...