आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित महिला अत्याचारप्रकरण उजेडात आणल्याने माझ्यावर गोळीबार : चित्ते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूूर- दलित महिलेवरील अत्याचार प्रकरण उजेडात आणल्यानेच माझ्यावर गोळीबार करण्यात आला. मुख्य आरोपींनी लोणी पोलिसांना दिलेल्या जबाबात गोळ्या झाडल्याची कबुलही केले. मात्र, तत्कालिन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे-साळुंके यांनी प्रकरण दडपले, असा गंभीर आरोप भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांनी केला.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत चित्ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ मुरकुटे, काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये, पतितपावनचे सुनील मुथ्था, शिवसेनेचे राजेंद्र देवकर, डॉ. महेश क्षीरसागर, सचिन बडदे, रिपाइंचे सुभाष त्रिभुवन, संदीप मगर आदी उपस्थित होते.

चित्ते म्हणाले, येथील दलित महिलेवर अत्याचार होऊन तीन दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. आपण पुढाकार घेऊन महिलेस पोलिसांत नेले. गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, पाठपुरावा केला. त्यामुळे आरोपींना अटक होऊन खटला चालला. तत्कालिन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर मी जाहीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी उचलून धरला. त्यामुळे हा प्रश्न त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला. ठाकरे यांना जाब विचारण्यात आला. याचा राग आल्याने ठाकरे यांनी माझ्याविरोधात तक्रार केली. याचे परिणाम तुला भोगावे लागतील, अशी धमकी मला फोनवरून दिली. याबाबत मी सुनील मुथ्था आम्ही फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शहर पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी फिर्याद दाखल करून घेण्यास नकार दिला.

दलित महिला प्रकरण, तसेच शहरातील गुंडगिरी विरोधात मी वेळोवेळी घेतलेली भूमिका यामुळे जुलै २०१३ मध्ये माझ्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र, ठाकरे यांनी या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. आरोपींना अभय दिले. हल्ला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हल्ल्यात वापरलेली मोटारसायकल टाकळीभानला पोलिसांना सापडली. शिवाय लोणी पोलिसांनी एका गंठणचोरीप्रकरणी अशोकनगर येथील बादशाह शब्बीर शेख नसीर दस्तगीर शेख या दोघांना अटक केली. त्यांनी गंठणचोरीबरोबरच चित्ते यांच्यावर २०१३ मध्ये गोळीबार केल्याची कबुली दिली. या दोघांनी लोणी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार दलित महिला अत्याचारप्रकरणी अशोकनगर येथील अल्ताफ बनेमिया शेख यास अटक करण्यात आली. याचा राग मनात धरून त्याचा भाऊ सलिम शेख याने बादशाह, नसीर आयुब कासम शेख यांना दोन गावठी कट्टे दिले. त्यांनी श्रीरामपुरात हिरोहोंडा चोरली. प्रकाश चित्ते कार्यालयातून घरी जात असताना त्यांनी समोरून मोटारसायकलीवरून येत आयूब नसीर यांनी गोळीबार केला. त्यानंतर हे गावठी कट्टे परत सलिम शेख यांना दिले.

या जबाबावरून मागील हल्ल्यातील आरोपी पोलिसांना निष्पन्न झाले, तरीही ठाकरे यांनी त्यांना पाठीशी घातले. लोणी पोलिसांकडून माहितीच्या अधिकारात जबाब मिळवले. त्यावरून वरील बाबी स्पष्ट झाल्या. पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, कारवाई झाली नाही. त्यामुळे गुन्हेगारांची हल्ला करण्याची हिंमत झाली. ठाकरे यांच्यासह या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी चित्ते यांनी केली.