आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बससेवेचा तिढा सुटता सुटेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहर बससेवेचा तिढा सुटण्याऐवजी तो अधिकच वाढत चालला आहे. महापालिका प्रशासनाने आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक परवाना देण्यास नकार दिला होता. दरम्यान, महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनी सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ठिय्या दिल्यानंतर मनपाचा शहर बससेवा वाहतूक परवान्याचा प्रस्ताव दाखल करून घेण्यात आला. प्रस्ताव दिला असला, तरी त्यात अनेक कागदपत्रांची कमतरता आहे. त्यामुळे शहर बससेवा सुरू होण्याचा तिढा अजून कायम आहे.
शहर बससेवा चालवणारी ठेकेदार संस्था प्रसन्ना पर्पलने गेल्या सहा महिन्यांपासून बंद केलेली बससेवा पुन्हा सुरू करण्यास महापालिका प्रशासनाला अजून यश आलेले नाही. प्रसन्नाने थकवलेला सुमारे ३३ लाखांचा कर कुणी भरायचा, असा प्रश्न आहे. या रकमेशी आमचा काहीही संबंध नाही, असे पत्र मनपा प्रशासनाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयालादिले आहे. शिवाय नवीन वाहतूक परवान्याचा प्रस्ताव संबंधित ठेकेदाराने द्यायचा की मनपाने, याबाबतही संभ्रम होता. मनपाने यापूर्वी केवळ वाहतूक परवाना मिळावा, असे पत्र दिल्याने आरटीओने वाहतूक परवाना देण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे महापौर जगताप यांनी सोमवारी काही नगरसेवकांसह आरटीओ कार्यालयात ठिय्या दिला.
उपविभागीय परिवहन अधिकारी विलास कांबळे रजेवर असल्याने जगताप यांनी सहायक उपविभागीय परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्याशी बससेवेच्या वाहतूक परवान्याबाबत चर्चा केली. बससेवा हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे वाहतूक परवान्याचा प्रस्ताव तातडीने दाखल करून घ्यावा, अशी मागणी जगताप यांनी केली. त्याबाबत कांबळे यांच्याशी त्यांनी फोनवर चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी वाहतूक परवान्याचा महापालिकेने दिलेला प्रस्ताव दाखल करून घेतला. प्रस्ताव दाखल झाला असला, तरी त्यात अनेक कागदपत्रांची कमतरता आहे.