आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा सत्ताधार्‍यांचा ‘प्रसन्ना पर्पल’ला टाटा; शहरात धावणार नवीन बस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरकरांना वेठीस धरून मनमानी पध्दतीने बससेवा पुरवणार्‍या ‘प्रसन्ना पर्पल’ला हद्दपार करण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी घेतला आहे. यापुढे एका स्थानिक उद्योजकामार्फत बससेवा चालवली जाणार आहे. त्याबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून प्रशासकीय कार्यवाहीनंतर लवकरच ही नवीन बससेवा सुरू होईल, अशी माहिती सत्ताधारी गटातील एका पदाधिकार्‍याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना बुधवारी दिली. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ‘प्रसन्ना’ची शिरजोरी कायमची थांबणार असून प्रवाशांची अवैध रिक्षाचालकांच्या जाचातूनही सुटका होईल.
‘प्रसन्ना पर्पल’ने शिरजोरीचा कळस गाठला होता. करारनाम्यातील अटी-शर्ती गुंडाळून ठेवत नगरकरांना वेठीस धरून या ठेकेदार संस्थेने मनपाकडून आतापर्यंत लाखो रुपये हडपले. आता आघाडीच्या सत्ताधार्‍यांनी ‘प्रसन्ना’चे लाड पुरवणे बंद करण्याचा निर्णय घेतला. यापुढे शहरात एका स्थानिक उद्योजकामार्फत बससेवा चालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक चर्चेत उद्योजक सेवा पुरवण्यास तयार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे ‘प्रसन्ना’च्या मनमानीतून महापालिकेची कायमची सुटका होणार आहे. या संस्थेने तीन वर्षात नुकसान भरपाईपोटी मनपाकडून लाखो रुपये वसूल केले, तरीदेखील पुन्हा दरमहा 7 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी; अन्यथा सेवा बंद करण्याचा इशारा या संस्थेने दोन आठवड्यांपूर्वी दिला. त्यामुळे दबावाखाली आलेल्या सत्ताधार्‍यांनी ठेकेदार संस्थेची मागणी तातडीने स्थायी समितीसमोर ठेवली. ही मागणी अवाजवी व करारनाम्याचे उल्लंघन करणारी असल्याचा ठराव स्थायीने केला. त्यामुळे धास्तावलेल्या या संस्थेने कोणतीही अधिकृत नोटीस न देता 18 जूनपासून बससेवा बंद करत नगरकरांना वेठीस धरले. बेकायदेशीरपणे सेवा बंद केल्याप्रकरणी प्रशासनाने संस्थेस कायदेशीर नोटीस बजावली. परंतु शिरजोर झालेल्या या संस्थेने ही नोटीसही धुडकावून लावली. नोटीस मान्य नसून सेवा बंद केल्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मिळावी, असे उलट पत्र संस्थेने प्रशासनाला दिले आहे. संस्थेची ही मनमानी मोडीत काढण्यासाठीच आता सत्ताधार्‍यांनी स्थानिक उद्योजकामार्फत बससेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

बससेवेबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने महासभा बोलवा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर संग्राम जगताप यांच्याकडे केली होती. त्यानुसार 5 जुलैला सकाळी 11 वाजता विशेष अंदाजपत्रकीय सभा व दुपारी 1 वाजता सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. दोन्ही सभांच्या विषयपत्रिकेवर बससेवेचा विषय घेण्यात आलेला नसला, तरी या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे.
दोन दिवसांत अपील दाखल करू
४बेकायदेशीरपणे सेवा बंद केल्याप्रकरणी ठेकेदार संस्थेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस मान्य नसून सविस्तर खुलासा सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्यावी, असे पत्र संस्थेने दिले आहे. सेवा बंद केल्याप्रकरणी करारनाम्यातील अटी व शर्तींचा आधार घेत संस्थेच्या विरोधात नगर विकास विभागाकडे दोन दिवसांत अपील दाखल करण्यात येणार आहे.’’
भालचंद्र बेहेरे, उपायुक्त.
नुकसान भरपाई वसूल करा
ठेकेदार संस्थेला आतापर्यंत नुकसान भरपाईपोटी दरमहा 2 लाख 96 हजार याप्रमाणे सुमारे 21 लाख रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नसताना ही रक्कम देण्यात आली. ही नगरकरांची मोठी फसवणूक आहे. दिलेली रक्कम सत्ताधार्‍यांनी स्वत:च्या नव्हे, तर नागरिकांच्या खिशातून दिली आहे. त्यामुळे ही रक्कम संबंधित संस्थेकडून वसूल करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
ठेकेदार संस्थेने गाशा गुंडाळला
बससेवा बंद केल्यानंतर ठेकेदार संस्थेचे तीन वरिष्ठ अधिकारी बुधवारी शहरात आले. त्यांनी सर्व कर्मचार्‍यांचे राजीनामे घेतले, तसेच वाहक व चालकांकडून घेतलेली अनामत रक्कम परत केली. कार्यालयातील फायली व इतर साहित्य त्यांनी पुण्याला हलवले. मनपातील सत्ताधार्‍यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे अखेर संस्थेने आपला गाशा गुंडाळला.
(फोटो - एएमटी बसचा फोटो)