आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एएमटी’च्या ‘प्रसन्ना पर्पल’ ठेकेदाराला आज नोटीस देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर बससेवा (एएमटी) बंद केल्याप्रकरणी ‘प्रसन्ना पर्पल’ या ठेकेदार संस्थेला शुक्रवारी कायदेशीर नोटीस देण्यात येणार आहे. त्यापूर्वी करारनाम्यातील सर्व कायदेशीर बाबी तपासण्यात येतील, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त (कर) भालचंद्र बेहरे यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
एएमटी बंद करण्याबाबत ‘प्रसन्ना पर्पल’चे येथील प्रतिनिधी दीपक मगर यांच्यामार्फत दिलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचे स्थायी समितीच्या सभेत स्पष्ट झाले. असे असतानाही ठेकेदार संस्थेने बुधवारपासून (18 जून) बससेवा बंद केली. त्यामुळे शहरातील हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सेवा बंद करण्यापूर्वी तीन महिने आधी अधिकृत प्रतिनिधीमार्फत नोटीस देणे आवश्यक असल्याचे स्थायी समितीने स्पष्ट केले. परंतु ठेकेदार संस्थेने करारनाम्याचा भंग करत सेवा बंद केली. त्यामुळे आता ठेकेदारावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सेवा बंद झाली त्या दिवशी महापालिका कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हता. आयुक्त विजय कुलकर्णी व उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे हे दीर्घ रजेवर आहेत, तर उपायुक्त बेहरे व यंत्र अभियंता परिमल निकम बुधवारी शासकीय कामासाठी मुंबईत होते. त्यामुळे एएमटी बंद होऊनही दोन दिवस ठेकेदार संस्थेवर कोणतीच कारवाई झालेली नाही.
सेवा सुरू करण्याचा करार आयुक्त व प्रसन्ना पर्पलचे अधिकृत प्रतिनिधी रोहित परदेशी यांच्यात झाला आहे. त्यामुळे सेवा बंद करण्याबाबत मगर यांच्यामार्फत आलेली नोटीस स्थायी समितीने बेकायदेशीर ठरवली. तसेच कराराचा भंग केल्याप्रकरणी ठेकेदार संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव स्थायीच्या सभेत करण्यात आला आहे. त्यानुसार सेवा बंद करणा-या ठेकेदार संस्थेवर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु मनपा अधिकारीच उपस्थित नसल्याने कारवाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.