आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराध्यक्षपदासाठी दोन गटांत रस्सीखेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारतीय जनताच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने घडामोडींनी वेग घेतला आहे. या पदासाठी खासदार दिलीप गांधी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या गटात रस्सीखेच आहे.
नव्या शहर जिल्हाध्यक्षाची निवड सोमवारी (१५ फेब्रुवारी) आहे. या पदासाठी गांधी आगरकर गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा, विधानसभा त्यानंतर झालेल्या स्थानिक निवडणुकांत गांधी-आगरकर गटात मतभेद निर्माण झाले होते. ते आजही कायम आहेत. त्यातच शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपच्या युवा मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षपदावरून खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्रसह त्यांच्या गटाच्या पाच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. गांधी गटाने नंतर थेट प्रदेशाध्यक्षांकडून या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पदावर घेतले.

गांधी आगरकर गट एकमेकांवर कुरघोड्यात करण्यातच धन्यता मानत असल्यामुळे सत्ता असूनही भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. दोन्ही गट एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. शहरातील एकही विकासकाम मार्गी लावण्यात भाजपला यश आले नाही. शहर जिल्हाध्यक्षासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष अॅड. आगरकर यांच्या गळ्यात पुन्हा या पदाची माळ पडण्याची शक्यता असली, तरी त्यांच्या नावाला खासदार गांधी गटाने विरोध दर्शवला आहे. आठ दिवसांपूर्वी आगरकर या पदासाठी इच्छुक नव्हते. मात्र, आता पुन्हा या पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याचे समजते.

भाजपचे सरकार सत्तेत नसताना आणि आता असतानादेखील नगर शहरातील भाजपचे कार्यालय कायम बंद असते. शहरातील भाजपचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. पक्षाचे शहरातील कार्यालय केवळ जयंत्या, पुण्यतिथी या कार्यक्रमापुरतेच उघडले जाते. त्यामुळेच हे पद देता नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असा आग्रह गांधी गटाने धरला आहे.

आगरकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना शहर जिल्हाध्यक्षपदाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी आगरकर गटाकडून होत आहे. या पदासाठी आगरकर यांच्याबरोबरच त्यांच्या गटाकडून सचिन पारखी, भय्या गंधे, गौतम दीक्षित यांच्याही नावांची चर्चा आहे. गांधी गटाकडून खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी, स्थायी समितीचे माजी सभापती बाबासाहेब वाकळे, सुनील रामदासी, माजी उपमहापौर गीतांजली काळे यांच्या नावांची चर्चा आहे. या दोन्ही गटांत या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. शहर जिल्हाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे मात्र सोमवारीच कळेल.

खासदार गांधींची प्रतिष्ठा पुत्रासाठी पणाला
खासदार दिलीप गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत आपले चिरंजीव सुवेंद्र यांना उमेदवारी मिळावी, यासाठी वरिष्ठ स्तरावर जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, अनुभव नसल्याचे कारण पुढे करून त्यांना ही उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांना ही उमेदवारी देण्यात आली. आताही शहर जिल्हाध्यक्षपद सुवेंद्र यांना मिळावे, यासाठी स्वत: दिलीप गांधी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान, खासदार दिलीप गांधी यांना जिल्हाध्यक्षपदासाठी सुवेंद्र गांधींना विचारणा झाली का, असे विचारले असता अद्याप काही ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री शिंदे यांची भूमिका महत्त्वाची
भाजपच्या नगर जिल्हा कोअर कमेटीची बैठक नुकतीच मुंबईत पालकमंत्री राम शिंदे, प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीतच नगरच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची तारिख निश्चित करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत पालकमंत्री राम शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार अाहे.