आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलालाशिवाय इथे होत नाहीत कामे..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर-औरंगाबाद महामार्गावरील नगर भूमापन कार्यालयात (सिटी सर्वे) अधिकारी व कर्मचारी अनेकदा हजर नसतात. त्यामुळे नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. विशेष म्हणजे दलालाशिवाय येथील एकही काम होत नाही. जागेचा उतारा, नकाशा, मोजणी व अन्य कामांसाठी येणार्‍यांची कुचंबणा होत आहे.

जागेचा उतारा काढणे, नाव लावणे व कमी करणे, फेरफाराची नोंद आदी कामांसाठी नागरिकांना नगर भूमापन कार्यालयात यावे लागते. कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची अरेरावीची भाषा, कार्यालयाबाहेर बसणार्‍या दलालांकडून होणारी लूट व किरकोळ कामासाठी मारावे लागणारे हेलपाटे यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. उतार्‍यासाठी अर्जावर 5 रुपयांचे तिकीट लावावे लागते. परंतु अर्ज व तिकीट कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना ते जास्तीचे पैसे देऊन बाहेरून खरेदी करावे लागतात. अर्ज दिल्यानंतर एका दिवसात उतारा मिळेल, असा फलक कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आला आहे. तथापि, अर्ज केल्यानंतर आठ-आठ दिवस उतारा मिळत नाही. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहात नसल्याने नागरिकांना अनेकदा रिकाम्या हातानेच परत जावे लागते. दलालांना 200 ते 300 रुपये दिल्यावर मात्र तातडीने उतारा मिळतो. या मनमानीबाबत नगर भूमापन अधिकारी पी. बी. होळीकर यांच्याकडे नागरिकांनी अनेकदा तक्रार केली, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.

वरिष्ठ लिपिक असलेली एक महिला कर्मचारी, तर चक्क टेबलावरील दूरध्वनी बंद करून बाहेर जाते. चहा व जेवणाचे कारण पुढे करून कर्मचारी दोन-तीन तास कार्यालयाबाहेर फिरत असतात. त्यामुळे नागरिकांना त्यांची वाट पहात ताटकळावे लागते. एखादा कर्मचारी कार्यालयात असेल तर तोही नागरिकांशी अरेरावीच्याच भाषेत बोलतो.

भूमापन अधिकारी अनुपस्थित.. - ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने भूमापन अधिकारी पी. बी. होळीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कार्यालयात हजर नव्हते. त्यांचा दूरध्वनीही बंद होता. एका कर्मचार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की सिटी सर्वे कार्यालयात कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. नागरिक मात्र आम्हालाच दोष देतात..