आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्रू दोन पिऊन, पाखरा येशील का परतून...?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "छत्रपतींची समाधी ते टिळक समाधी' असा "सिटी वॉक' रविवारी मोठ्या उत्साहात झाला. रेसिडेन्शिअल विद्यालयासमोरील छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची समाधी आणि पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. भि. ना. दहातोंडे व प्रा. गणेश भगत यांनी चौथे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची गाथा उलगडली. ब्रिटिशांची गुलामगिरी झिडकारणा-या या राजाची निर्घृण हत्या नगरच्या किल्ल्यात 25 डिसेंबर 1883 या दिवशी झाली.
त्यांच्या अखेरच्या दिवसांतील हकिकतीची अस्सल कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे डॉ. दहातोंडे यावेळी म्हणाले. या परिसरात असलेले हुतात्मा स्मारक, तसेच स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेल्या लक्ष्मण रामचंद्र वरखेडकर यांच्याविषयीची माहिती भूषण देशमुख यांनी सांगितली.
नंतर मंडळी पोहोचली खाकीदासबाबा मठातील जगन्नाथ मंदिरात. पुरी येथील मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या व रथयात्रेचे आयोजन करणाऱ्या या देवस्थानची माहिती तेथील पुजारी पंडित मिश्रा, विश्वस्त शिवदास डागा व व्यवस्थापक संदीप लंघे यांनी दिली. खाकीदासबाबांची समाधी, चिंचेच्या झाडाजवळ असलेली त्यांची तपोभूमी, वरद गणेश व पंचमुखी हनुमानाची मूर्ती यांचे दर्शन घेण्यात आले.
"सिटी वॉक'ची सांगता झाली लालटाकी येथील खिश्चन दफनभूमीतील मराठी नामवंत कवी नारायण वामन टिळक यांच्या समाधीजवळ. नगरमधील पहिले नियतकालिक "ज्ञानोदय'चे अनेक वर्षे संपादक असलेल्या रेव्हरंड टिळकांनी मुलांसाठी "बालबोधमेवा' नावाची विशेष पुरवणी महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू केली. टिळकांनी रचलेले शेकडो अभंग, भक्तिगीते आजही चर्चमध्ये गायली जातात. बालकवींचे वास्तव्य अनेक वर्षे त्यांच्या नगरमधील घरी होते. टिळकांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर संजय आढाव, रवींद्र ठोंबरे यांनी टिळकांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना यावेळी सांगितल्या. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी टिळकांनी लिहिलेली "....ये आता घे शेवटचे हे अश्रू दोन पिऊन, पाखरा येशील का परतून...' व "रानात एकटेच पडलेले फूल' या, तर प्रा. डॉ. धोंडीराम वाडकर यांनी "केवढे हे क्रौर्य' ही कविता सादर केली. या परिसरात असलेली रॉबर्ट ह्यूम, मोडक कुटुंबीय, तसेच अहमदनगर महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. भा. पां. हिवाळे व त्यांच्या पत्नी रूथबाई यांच्या समाधीलाही अभिवादन करण्यात आले. अहमदनगर पहिली मंडळीचे जॉन शेक्सपिअर, सुनील सोनवणे, राजू देठे, प्रसन्न शिंदे यांच्यासह प्रा. एन. बी. मिसाळ, सुधीर मेहता, सुरेश खामकर, प्रवीण बोरा, नवनाथ वाव्हळ, शिवानंद भांगरे व अनेक इतिहासप्रेमी या "सिटी वॉक'मध्ये सहभागी झाले होते.
"प्रेमाने दिल्या खुणांतून एकतरी आठवून, पाखरा येशील का परतून...' रेव्हरंड नारायण वामन टिळकांच्या अशा काही कविता त्यांच्या समाधीजवळ म्हणत रविवारी या "फुला-मुलांच्या कवी'ला आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात आली. गुलाबी थंडीत कोवळं उन्हं अंगावर घेत नाताळ सणाच्या पहिल्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाला साहित्य, शिक्षण, पत्रकारिता, समाजसेवा आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिळक हे संतपुरुष
रेव्हरंड ना. वा. टिळक यांना "फुला-मुलांचे कवी' असे म्हटले जात असले, तरी ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या परंपरेतील संतच होते. त्यांचा उल्लेख "संत' म्हणूनच व्हावा. दीनदुबळ्यांसाठी झिजलेल्या टिळकांनी शेकडो अभंग रचून मराठी बांधवांना धर्माचा खरा अर्थ सांगितला. आज जगभर साजरा केला जाणारा मदर्स डे (मायवार) रेव्हरंड टिळकांनीच सन १९०३ मध्ये प्रथम नगरमध्ये सुरू केला. अजूनही तो साजरा केला जातो. टिळकांचे िनधनही मायवारीच झाले, असे ठोंबरे यांनी सांगितले.

माहितीफलक हवे- दिल्ली दरवाजा ते लालटाकी रस्त्याने रोज हजारो नागरिक, तसेच विद्यार्थी ये-जा करतात. तथापि, अनेकांना छत्रपती चौथे शिवाजी महाराज, हटयोगी खाकीदासबाबा आणि रेव्हरंड टिळकांच्या समाधीविषयी, त्यांच्या कार्याबद्दल थोडीही माहिती नसते. नगरला ललामभूत ठरलेल्या या लोकोत्तर व्यक्तींचे अल्पचरित्र सांगणारे सचित्र फलक महापालिकेने या रस्त्यावर लावायला हवेत, अशी अपेक्षा "सिटी वॉक'मध्ये व्यक्त केली. रेव्हरंड टिळकांच्या समाधी परिसरात उद्यान तयार करावे, असे काहींनी सूचवले.