आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Water Scheme: 60 Percent Work Complete Within Five Years

शहर पाणी योजना: पाच वर्षांमध्ये अवघे ६० टक्के काम पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ११६ कोटी रुपयांच्या सुधारित पाणी योजनेचा (फेज टू) बोजवारा उडाला आहे. महापालिका प्रशासन आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे पाच वर्षांच्या कालावधीत योजनेचे अवघे ६० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित कामासाठी देखील आणखी काही वर्षे लागणार आहेत, तोपर्यंत नगरकरांना मिळेल तेवढ्या पाण्यात समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान, महापौर अभिषेक कळमकर यांनी संबंधित ठेकेदार संस्थेला १५ एप्रिलपर्यंतचा शेवटचा अल्टीमेटम दिला आहे.

केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी फेज टू योजनेचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी मनपात सत्तांतर होऊन निवडून आलेल्या पदािधकाऱ्यांनी सुरुवातीला योजनेच्या कामासाठी आढावा बैठका घेतल्या. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. कामास गती मिळण्याऐवजी कामच बंद होण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली होती. ज्या ठेकेदार संस्थेला पाणी योजनेच्या कामाचा कोणताही अनुभव नाही, त्या ठेकेदार संस्थेला योजनेच्या कामाचा ठेका देण्याचे काम पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केले. मनपात सत्तांतर झाल्यानंतर, तरी या कामास गती मिळेल,अशी नगरकरांची अपेक्षा होती. परंतु त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. योजनेच्या काही कामासाठी पुन्हा २० कोटींची निविदा काढून दुसऱ्या एका ठेकेदाराची नियुक्ती केली, तरी देखील योजनेच्या कामाला गती मिळाली नाही. दरम्यान, पूर्वीचे सत्ताधारी आताच्या सत्ताधाऱ्यांना रखडलेल्या कामावरून वेठीस धरत आहेत. सत्ताधाऱ्यांना पाणी योजनेपेक्षा परमिटरूमचा विषय महत्त्वाचा वाटतो, अशी बोचरी टीका विरोधकांनी बुधवारी झालेल्या सभेत केली. महापौर अभिषेक कळमकर यांनी योजनेच्या कामातील अडचणी दूर झाल्या आहेत. शिवाय येत्या १५ एप्रिलपर्यंत कामात सुधारणा झाल्यास ठेकेदार संस्थेवर कारवाई करणार असल्याचेही कळमकर यांनी स्पष्ट केले. परंतु याच ठेकेदार संस्थेने वर्षभरापूर्वी काम बंद करत असल्याची नोटीस मनपाला बजावली होती. त्यामुळे ठेकेदार संस्थेच्या कामात सुधारणा होईल, याबाबत शंका आहे. पाच वर्षांत योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित कामासाठी आणखी किती वर्षे लागणार हे येणारा काळच ठरवेल. नगरकरांना मात्र प्रत्येक वेळी सुधारित पाणी योजनेचे गाजर दाखवण्यात येत आहे.

शहराचा पाणीप्रश्न गंभीर
शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था चार दशकांपूर्वीची आहे. ही वितरण व्यवस्था खिळखिळी झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. वर्षभरापूर्वी खराब जलवाहिन्यांमुळे शहरात हजारो नागरिकांना काविळीची लागण झाली होती. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याने सध्या प्रतिमाणसी दररोज केवळ ६० ते ७० लिटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी पुरेसे नसल्याने नगरकरांच्या दृष्टीने फेज टू योजना महत्त्वाची आहे.

महापौर कळमकर घेणार स्वतंत्र महासभा
शहरसुधारित पाणी योजनेच्या सद्यस्थितीबाबत नागरिकांसह नगरसेवकांमध्ये देखील संभ्रम आहे. त्यामुळे पाणी योजनेच्या कामाबाबत चर्चा करण्यासाठी स्वतंत्र महासभा बोलवा, अशा मागणीचे पत्र अनेक नगरसेवकांनी महापौर प्रशासनाला दिले आहेत. बुधवारी झालेल्या सभेत काही नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापौर अभिषेक कळमकर यांनी पाणी योजनेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी लवकरच स्वतंत्र महासभा बोलावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.