आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City's Tension Increases By Sani Shinde Murder Case

सनी शिंदेच्या खुनामुळे शहरात तणाव वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भोसले आखाडा येथील सनी शिंदे याच्या घरासमोर शुक्रवारी मोठा जमाव जमला होता.
सनी शिंदे याच्या खुनानंतर नगर शहरातील भोसले आखाड्याला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. छाया: कल्पक हतवळणे)
नगर - प्रेमप्रकरणातून दलित युवक सनी शिंदे याच्या झालेल्या खुनामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी जुलैला रात्री औरंगाबाद रस्त्यावरील कोठी येथे अचानक रास्ता रोको करण्यात आला. शुक्रवारी दिवसभर वातावरण आणखी तणावपूर्ण बनले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. बुरुडगाव रस्त्यावरील भोसले आखाड्यात सर्वाधिक तणाव आहे.

दलित संघटना नातेवाईकांच्या आग्रहामुळे सनीचे शवविच्छेदन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात इन कॅमेरा करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नगरला आणण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजता सनीचा मृतदेह घेऊन शववाहिनी भोसले आखाडा परिसरात त्याच्या घराजवळ आली. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यास त्याच्या घरातील कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने शववाहिनी रात्री नऊपर्यंत थांबून होती. त्याची आई पाटोदा पोलिस ठाण्यात गेली होती. रात्री उशिरा त्या घरी परतल्या. वडिल मोठ्या भावाचा जामीन अर्ज फेटाळला गेल्याने ते सबजेलमध्येच होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सनीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते. या प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सनीच्या नातेवाईकांकडून मांडण्यात येत होती.

याप्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी मृत सनी यांची घरे एकाच परिसरात असल्याने तेथे जास्त तणावाचे वातावरण होते. अमरधाम स्मशानभूमी समोरही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सुरुवातीला नीलक्रांती चौकातही पोलिसांची कुमक तैनात होती.

गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास संतप्त कार्यकर्त्यांनी कोठी परिसरात रास्ता रोको करून आरोपींच्या अटकेची मागणी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे स्टेशन रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

आठवले आज नगरमध्ये
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले शनिवारी नगरमध्ये येणार आहेत. शिंदे कुटुंबीयांची भेट घेऊन ते घटनेची अधिक माहिती जाणून घेणार आहेत. नंतर ते पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका जाहीर करतील. नियोजित कार्यक्रमानुसार पालकमंत्री राम शिंदे शनिवारी सकाळी नगरमध्ये आहेत. त्यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.

नगर जिल्ह्याच्या विकासाला मारक
घडलेली घटना अतिशय धक्कादायक आहे. सनीला अमानुषपणे मारल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून आरपीआयच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या नगर जिल्ह्यात दलितांवर वारंवार होणारे हल्ले पडणारे खून यामुळे जिल्ह्याची बदनामी होते. याचा जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होत आहे. अशा घटनांनी दोन समाजात दरी वाढत असून परस्परांविषयी मनात अढी राहत आहे. राजकीय, सामाजिक नेते प्रशासनाने एकत्रित बसून समन्वयाने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. पुन्हा अशा घटना होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.'' अशोक गायकवाड, प्रदेशसचिव, आरपीआय.

पोलिसांना पूर्वकल्पना
अल्पवयीन मुलीच्या अपहरण लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेला सनी बालगृहातून पळून गेल्यानंतर त्याच्या जीवाला धोका असल्याची कल्पना पोलिसांना होती. काहींनी पोलिसांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. घटना घडल्यानंतर मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावत अनुचित प्रकार टाळण्याचा प्रयत्न केला.