आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Civic News In Marathi, Bad Situation Of Roads, Divya Marathi

मोठय़ा वाहनांचा प्रवास खडतरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे व मनमाड रस्त्याला जोडणार्‍या केडगाव-निंबळक बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन होऊन पंधरा दिवस उलटले, तरीही या रस्त्याचे काम अजून अपूर्णच आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणार्‍या अवजड वाहनांच्या नशिबी अजूनही खडतर प्रवासच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र या बाह्यवळण रस्त्यासह जिल्ह्यातील प्रलंबित असलेली सर्वच महामार्गांची कामे लवकरच मार्गी लागतील, असा दावा केला आहे.
उत्तर व दक्षिण भारताला जोडणारे प्रमुख महामार्ग नगर शहरामधून जातात. परंतु या महामार्गांवरून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नगर शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महामार्गांवरील अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्यांवरून वळवण्यात येणार आहे. तीन बाह्यवळण रस्ते प्रस्तावित आहेत. त्यापैकी शेंडी ते एमआयडीसी हा बाह्यवळण रस्ता आधीपासूनच सुरू आहे.
पंधरा दिवसांपूर्वी केडगाव-निंबळक बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला, तर केडगाव-अरणगाव बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे.
केडगाव-निंबळक रस्त्यावरील बरेचसे काम अपूर्ण असतानाही 2 फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते उद्घाटन करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या रस्त्यावर निंबळक शिवारात असलेल्या उड्डाणपुलाला जोडणार्‍या भराव रस्त्याचे डांबरीकरण अजूनही झालेले नाही.
भराव रस्त्यावर पडलेली खडी अजूनही तशीच आहे. उद्घाटन होण्यापूर्वी उड्डाणपूल ते मनमाड महामार्गापर्यंत बाह्यवळण रस्त्यावर बरेच खड्डे होते. आता ते बुजवले असले, तरी ते किती दिवस तग धरणार याबाबत साशंकताच आहे. रेल्वे विभागाचे अभियंता प्रमोद पोळ यांनी त्यांच्या हद्दीतील पुलाचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. बांधकाम विभाग कामे अपूर्ण असली, तरी वाहतूक सुरळीत होत असल्याचे सांगत आहे.
निंबळक शिवारातील उड्डाणपुलासाठी 14 कोटी, तर भराव रस्त्यासाठी 9 कोटी असा एकूण 23 कोटींचा खर्च झाला आहे. हा सर्व खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून झाला. दुरुस्तीसाठी आणखी निधीची मागणी करण्यात आली असून हा निधीही लवकरच मिळणार आहे.
बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न थोडाफार सुटला आहे. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेले बाह्यवळण रस्त्याचे काम झाले खरे. पण, पुलाला जोडणार्‍या उड्डाणपुलाच्या भराव रस्त्याचे साधे डांबरीकरणही अजून पूर्ण झालेले नाही. भराव रस्त्यावर बारीक खडी पडलेली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. 2 फेब्रुवारीला बाह्यवळण रस्त्यावर उद्घाटनाच्या दिवशी निंबळककडून पुलावर जोडला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. भराव रस्त्यावरील साईडपट्टय़ांची अवस्थाही बिकट आहे. उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी निंबळक ग्रामस्थांसह वाहनचालकांची मागणी आहे.