आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Civil Hospital City Scan Machine Not In Working In Nagar

जिल्हा रुग्णालयात "सिटी स्कॅन'ला धूळ; रुग्णांना करावी लागते खासगी रुग्णालयात तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सुविधा दोन महिन्यांपासून उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन जास्त पैसे मोजून तपासणी करून घ्यावी लागत आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयासाठी तीन कोटींचे नवे सिटी स्कॅन यंत्र मंजूर झाले आहे. मात्र, अजून ते रुग्णालयाला मिळालेले नाही.

ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना अल्पदरात आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय रुग्णालय सुरू करण्यात आली आहेत. तालुकास्तरावर आरोग्य उपकेंद्रे आहेत. मात्र, तेथे अत्याधुनिक सुविधा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात यावे लागते. नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज चारशेहून अधिक रुग्ण विविध तपासण्या, उपचार, तसेच शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येतात. सध्या या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. कार्पोरेट कार्यालयासारखे जिल्हा रुग्णालय बाहेरून दिसत असले, तरी प्रत्यक्षात रुग्णांच्या दैनंदिन तपासणीसाठी लागणाऱ्या सुविधांची वानवा आहे.
मागील दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन यंत्र नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयात जाऊन सिटी स्कॅन करून घ्यावे लागते. त्यासाठी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन विभागाच्या नूतनीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅनद्वारे मेंदूची तपासणी करण्यासाठी ३०० रुपये लागतात. छातीच्या तपासणीसाठी ४०० रुपये लागतात. हे दर फलकावर लावण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयात मात्र सिटी स्कॅन तपासणीसाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. शिवाय ही सुविधा शहरातील काही खासगी रुग्णालयांतच आहे.
तेथेही रुग्णांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होते. जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन यंत्र नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होते. जिल्हा रुग्णालयाला तीन कोटींचे सिटी स्कॅन यंत्र मंजूर झाले आहे. मात्र, ते यंत्र दोन महिने उलटूनही जिल्हा रुग्णालयात आलेले नाही.

आपत्कालीन कक्षाला लागले कुलूप...
जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येतात. मात्र, आल्यानंतर रुग्णांना अनेक महत्त्वाचे कक्ष बंद असलेले दिसतात. रुग्णवाहिकेसाठी असलेल्या आपत्कालीन कक्षाला बुधवारी दुपारी कुलूप लावलेले होते. परिचारिका कक्ष, कॉल सेंटर कक्ष, तसेच रुग्णालयात असलेले दोन पोलिस कक्षांनादेखील कुलूप होते.

आमचा पाठपुरावा सुरू
^आधीचे सिटी स्कॅन यंत्र कळवण येथे पाठवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयासाठी विप्रोचे तीन कोटींचे नवे सिटी स्कॅन यंत्र मंजूर झाले आहे. पण ते रुग्णालयाला अजून मिळालेले नाही. त्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. ते यंत्र लवकरच मिळेल.'' डॉ. एस. एम. सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक.