आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडी मारणार्‍या डॉक्टरांचा अर्धा पगार यापुढे कापणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा रुग्णालयातील सायंकाळच्या ओपीडीला दांडी मारणार्‍या डॉक्टरांचा अर्धा दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर यांनी घेतला आहे. सर्वच डॉक्टर या ओपीडीला दांडी मारत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या ओपीडीची डॉ. निटूरकर यांनी दोनदा स्वत: पाहणी करून हा निर्णय घेतला.

सायंकाळी चार ते पाचदरम्यान एक तासाची ओपीडी डॉ. निटूरकर यांनी सुरु केली. मात्र, या ओपीडीसाठी येणार्‍या रुग्णांना डॉक्टर उपस्थित नसल्याने खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत होती. मागील सलग पाच दिवस सायंकाळच्या ओपीडीची ‘दिव्य मराठी’ने पाहणी केली. सायंकाळच्या ओपीडीला एकही डॉक्टर उपस्थित राहत नसल्याचे धक्कादायक वास्तव या पाहणीत आढळून आले. अपघात विभाग व एक्स-रे विभाग याला अपवाद होता. यासंदर्भात सविस्तर वृत्त गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला खडबडून जाग आली.

सातत्याने दांडी मारणारे बहुतांश डॉक्टर शुक्रवारी सायंकाळच्या ओपीडीला उपस्थित होते. स्वत: डॉ. निटूरकर यांनी एक तासाच्या कालावधीत दोनदा रुग्णालयात फिरून पाहणी केली. प्रत्येक विभागात जाऊन त्यांनी पाहणीसोबतच दररोज उपस्थित राहण्याबाबत डॉक्टर व कर्मचार्‍यांना सूचना दिल्या. शुक्रवारच्या ओपीडीला 75 टक्के डॉक्टरांची उपस्थिती होती. कारवाईच्या बडग्याला भीक न घालणारे 25 टक्के डॉक्टर व कर्मचार्‍यांनी ओपीडीला दांडी मारली. सायंकाळच्या ओपीडीसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात आले आहे. जे डॉक्टर अनुपस्थित राहतील, त्यांचा त्या दिवसाचा अर्धा पगार कापण्यात येणार असल्याची माहिती डॉ. निटूरकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली आहे. रुग्णांनीही या निर्णयाचे स्वागत केले.

रिक्त पदांबाबत संचालकांना पत्र
जिल्हा रुग्णालयात सध्या विशेषज्ञ डॉक्टरांची 10 पदे रिक्त आहेत. यात चिकित्सा व बाह्यसंपर्क विभागाच्या निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांचाही समावेश आहे. बाह्यसंपर्क विभागाच्या निवासी वैद्यकीय अधिकार्‍याचे पद फेब्रुवारी 2011 पासून रिक्त आहे. जिल्हा रुग्णालयातील 10 व ग्रामीण, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील 13 रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करणारे पत्र डॉ. निटूरकर यांनी आरोग्य संचालकांना पाठवले आहे. रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कारवाईत सातत्य ठेवू
कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार आहे. दररोज हजेरी रजिस्टर तपासण्यात येईल. जितके दिवस डॉक्टर सायंकाळच्या ओपीडीला गैरहजर आढळतील, तितक्या दिवसांचा अर्धा पगार कापला जाईल. त्यानंतरही फरक पडला नाही, तर नोटीस देऊन खुलासा मागवण्यात येईल. नंतर कारवाईचा बडगा उगारला जाईल. यातून निश्चितच सकारात्मक बदल घडतील. सायंकाळच्या ओपीडीला शंभर टक्के उपस्थिती होत नाही तोपर्यंत कारवाईत सातत्य ठेवण्यात येईल.’’ डॉ. रवींद्र निटूकर, जिल्हा शल्य चिकित्सक.