आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायंकाळच्या ओपीडीला सगळ्या डॉक्टरांची दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्य सरकारच्या साडेनऊ कोटींच्या अनुदानातून जिल्हा रुग्णालयात सध्या विविध कामे सुरू आहेत. या बांधकामांबरोबर रुग्णसेवेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असताना त्यातच हलगर्जीपणा होत आहे. गेले पाच दिवस (29 जून ते 3 जुलै) ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत सायंकालिन ओपीडीत एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे आढळून आले.

रुग्णांच्या सोयीसाठी सायंकाळी चार ते पाचदरम्यान ओपीडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या ओपीडीसाठी येणार्‍या रुग्णांना उपचारांविना परतावे लागते. वर्ग एकचे पाच वैद्यकीय अधिकारी व वर्ग दोनचे 28 डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. सायंकाळची ओपीडी या सर्व डॉक्टरांना बंधनकारक करण्यात आली आहे. ‘दिव्य मराठी’ने शुक्रवार ते बुधवारी सायंकाळी चार ते पाच या वेळात जिल्हा रुग्णालयात थांबून पाहणी केली असता एकही डॉक्टर ओपीडीकडे फिरकले नाहीत.

मेडिसीन, जनरल, कान-नाक-घसा, बालरोग, मनोरुग्ण, दंतचिकित्सा, अस्थिरोग, सजिर्कल यातील काही ओपीडींना चक्क कुलूप होते, तर काही उघड्या असलेल्या ओपीडींमधून डॉक्टर गायब होते. आयुष कक्ष, स्त्री इंजेक्शन कक्ष, परिसेविका कक्ष, सुरक्षा क्लिनिक, मलमपट्टी विभाग, सोनोग्राफी कक्ष, र्शवण चाचणी क्षमता या कक्षांत कर्मचारीही उपस्थित नव्हते. अपघात कक्ष, एक्स-रे विभाग, प्रयोगशाळा व रक्तपेढी हे विभाग फक्त सुरू होते. या ओपीडीला दांडी मारून बहुतांश डॉक्टर खासगी रुग्णालयात चाकरी करत असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डॉक्टर दांडी मारण्यास सरावले आहेत. प्रशासनाला मात्र याचे सोयरसुतक नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर बांधकामे सुरू असल्याचा गवगवा करत आहेत. मात्र, आहे त्या सुविधांचा रुग्णांना उपयोग होत नाही, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत आहेत.

कर्मचार्‍यांवर वचक नाही
प्रशासनाचा कर्मचार्‍यांवर वचक नाही. काही कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी हजर न होता जिल्हा रुग्णालयातच काम करत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या जवळचे असणारे स्वीय सहायक व इतर पदांवर गेल्या अनेक वर्षांपासून त्याच-त्याच व्यक्ती विराजमान आहेत. इतरत्र बदली झाल्याचे दाखवून संबंधित पदावरच सेवेची संधी देण्यात येते. या कर्मचार्‍यांना बदलीचा कायदा लागू नाही का, असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जात आहे.

संबंधितांना नोटिसा देऊ
सायंकाळच्या ओपीडीला डॉक्टर उपस्थित नसतात ही वस्तुस्थिती आहे. डॉक्टरांना सवय लागायला थोडासा कालावधी लागेल. या ओपीडीला उपस्थित राहण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रतिसाद मिळत नाही. अनुपस्थितीबाबत संबंधित डॉक्टरांना नोटिसा देण्याचा विचार सुरू आहे.’’ डॉ. रवींद्र निटूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक.