आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया करण्यास जिल्हा रुग्णालयाचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा सरकारी रुग्णालयातील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महापालिकेच्या सफाई कामगाराच्या हाताच्या तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यास तेथील डॉक्टरांनी गुरुवारी सपशेल नकार दिला. "तुम्हाला शस्त्रक्रियेसाठी एक दिवस थांबावे लागेल, त्यापेक्षा तुम्ही खासगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करून घ्या,' असा सल्ला तेथील एका डॉक्टरने दिला. अखेर या सफाई कर्मचार्‍याने हजार २०० रुपये खर्च करून खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घेतली. जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराविरोधात महापालिका कामगार संघटना येत्या सोमवारी तीव्र आंदोलन करणार आहे.

महापालिका सफाई कर्मचारी भानुदास पवार हे कचर्‍याने भरलेला हायड्राेलिक कंटेनर खाली करण्यासाठी सकाळी बुरूडगाव कचरा डेपोवर गेले होते. कचरा खाली केल्यानंतर त्यांच्या उजव्या हाताची दोन बोटे कंटेनरच्या मागील फाळक्यात अडकली. ड्रायव्हरच्या लक्षात येण्यापूर्वीच त्यांची बोटे हायड्रोलिकच्या दाबाने तुटली. त्यानंतर मनपाच्या गॅरेज विभागप्रमुखांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. परंतु तेथील एका डॉक्टरने केवळ पट्टी करून दिली, शस्त्रक्रियेसाठी एक दिवस थांबावे लागेल, त्यापेक्षा तुम्ही खासगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करून घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी पवार यांना दिला. नाइलाजास्तव पवार यांनी एका खासगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली. खासगी रुग्णालयात त्यांना शस्त्रक्रिया शुल्क दीड हजार, टाके टाकण्यास साडेचार हजार भूलतज्ज्ञांची फी हजार २०० असे हजार २०० रुपये खर्च करावे लागले.

त्यानंतर पवार हे मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, उपाध्यक्ष आनंद वायकर यांच्या मदतीने पुन्हा जिल्हा रुग्णालयात आले. शस्त्रक्रियेस नकार देणार्‍या जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक एस. एम. सोनवणे यांच्या दालनात गेले, परंतु सोनवणे नागपूर येथे गेल्याने त्यांचा चार्ज अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाडे यांच्याकडे होता. गाडेदेखील दुपारी साडेतीनपर्यंत रुग्णालयात नव्हते. त्यामुळे संतापलेल्या मनपा कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी येत्या सोमवारी जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त अजय चारठाणकर यांनी पवार यांची विचारपूस केली. मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, आस्थापना विभागप्रमुख अंबादास सोनवणे, आयुक्तांचे स्वीय सहायक शेखर मगर यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन पवार यांची भेट घेतली. जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे पवार यांच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, शिवाय त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात सात हजार रुपये मोजावे लागले.

सोमवारी आंदोलन
एखादी अत्यवस्थ व्यक्ती शस्त्रक्रियेसाठी आली, तर जिल्हा रुग्णालय प्रशासन काय करेल... शस्त्रक्रिया करण्यास येथील डॉक्टर नकार देतात. जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. अशा वेळी त्यांची अडवणूक करण्यात येते. नाइलाजाने त्यांना खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च करून उपचार घ्यावे लागतात. जिल्हा रुग्णालयाच्या या ढिसाळ कारभारविरोधात येत्या सोमवारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.'' अनंतलोखंडे, अध्यक्ष, कामगार संघटना, मनपा.

रुग्णालयात रुग्णांची वारंवार होतेय हेळसांड...
जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून येणार्‍या गोरगरिब रुग्णांची संख्या अिधक आहे. त्यात अपंग रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, जिल्हा प्रशासन या रुग्णांना चांगली सेवा देण्यात अपयशी ठरत आहे. अपंगांच्या संघटनांसह इतर सामाजिक संघटनांनी वारंवार आंदोलने करूनही जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारलेला नाही.

संबंधित डॉक्टरला नोटीस
उपचारासाठी आलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात माझी संबंधित रुग्णाबरोबर आलेल्या व्यक्तींशी चर्चा झाली. त्यावेळी शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरला देण्याचे आश्वासन मी त्यांना दिले. रुग्णांना चांगली सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्मचारी संघटनेच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित डॉक्टरला नोटीस बजावणार आहे.'' डॉ.पी. एस. कांबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी.