आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"स्मार्ट नगर'साठी पत्रकारांची साथ हवी, खासदार दिलीप गांधी यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. यापुढील काळात नगर शहर "स्मार्ट सिटी' बनवण्यात पत्रकारांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले, तर गृहमंत्री राम शिंदे यांनी शासन, प्रशासन आणि लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
दर्पण दिनानिमित्त प्रेस क्लबच्या वतीने हॉटेल संकेतच्या तुषार गार्डनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार गांधी होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री शिंदे, आमदार संग्राम जगताप, उपमहापौर सुवर्णा कोतकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, नगर टाइम्सच्या संपादक मीनाताई मुनोत, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख आदी उपस्थित होते. पालकमंत्री शिंदे म्हणाले, शासन, प्रशासन आणि लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या या भूमिकेमुळेच लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना मान्यता मिळाली आहे. नगर येथे उभारण्यात येत असलेल्या पत्रकार भवनाबाबत आवश्यक ती माहिती घेऊन योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
खासदार गांधी म्हणाले, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला जातो. बातम्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्नही मार्गी लागतात. नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकारांचे पाठबळ आवश्यक अाहे. पत्रकारांच्या मदतीनेच या शहरात विविध सुधारणा करता येऊ शकतील.

हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे सामाजिक पत्रकारिता पुरस्कार भूषण देशमुख, महेश देशपांडे, सुधीर लंके, राजेंद्र झोंड, मुरलीधर कराळे, इकबाल शेख, रमेश देशपांडे, शिल्पा रसाळ, समीर मन्यार यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. वर्षभरात विविध संस्थांचे पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार जगताप, उपमहापौर कोतकर यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कारार्थींच्या वतीने महेश देशपांडे यांनी सत्काराला उत्तर दिले. स्वातंत्र्यसैनिक गनीभाई शेख यांनी अजीजभाई चष्मावाला यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रेस क्लबच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम चालू ठेवल्याबद्दल मन्सूर शेख यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजयसिंह होलम यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जामखेड येथील पत्रकारांच्या वतीनेही पुरस्कार्थींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले.
नगर प्रेस क्लब ज्येष्ठ पत्रकार हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानचा सामाजिक पत्रकारिता पुरस्कार मंत्री राम शिंदे खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते सहपरिवार स्वीकारताना "दिव्य मराठी'चे भूषण देशमुख. यावेळी आमदार तथा महापौर संग्राम जगताप, उपमहापौर सुवर्णा कोतकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा, मीनाताई मुनोत, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख आदी उपस्थित होते.
जणू स्नेह मेळावाच...
याकार्यक्रमाला पत्रकार, वृत्तछायाचित्रकार, तसेच दूरचित्रवाणीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील अनेक मान्यवरही आवर्जून आले होते. सर्वांसाठी भेटवस्तू स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. पुरस्कारार्थींचा सहपरिवार गौरव करण्यात आला.