आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी महा‍अभियान: नगर शहर व्हावे स्वच्छ आणि सुंदर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मध्यंतरी ‘व्हॉटस् अॅप’वर आपण नगरी असल्याचा अभिमान बाळगणारी एक पोस्ट फिरत होती. मात्र, नगर शहराचा आजचा जो चेहरा आहे, त्याबद्दल खूप अभिमान बाळगावा असं फारसं काही घडत नाही. स्वच्छतेशी आरोग्य निगडित असते. आरोग्याच्या बाबतीत आपल्या शहराचा क्रमांक खाली सरकत आहे. याचे कारण जसे महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेत आहे, तसेच नागरिकांच्याही. स्वच्छतेच्या बाबतीत आपलं नगर शहर मोठ्या शहरांच्या तुलनेत कोठेच दिसत नाही.
दररोज शहरातून निर्माण होणाऱ्या वारेमाप कचऱ्याचे व्यवस्थापन आपण करू शकलो नाही. शहरातील अनेक मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढिग दिसतात. या ढिगावर मुक्तपणे वावरणारी मोकाट जनावरांचे दृश्य नगरमध्ये सार्वत्रिक बनू पाहत आहे. विशेषत: प्लास्टिकच्या वापराबद्दल तर आपण अक्षरश: डोळ्यांवर कातडे पांघरल्यासारखी भयावह स्थिती आहे.
मंगल कार्यालयांच्या परिसरात समारंभानंतर प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या ताटांचा खच पडलेला दिसतो. हे बदलण्याची गरज आहे. सर्वजण पुढे येतील, तेव्हाच ही परिस्थिती बदलू शकते.

एखाद्या शहराचे हवाई दृष्य घेतले, तर ते खूप सुंदर दिसते. नगरही त्याला अपवाद नाही. येथील जमिनीवरची वस्तुस्थिती वेगळी आहे. मोजके अपवाद वगळता सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसते. सफाईसाठी फक्त ८२५ कर्मचारी आणि कचरा करणारे मात्र साडेचार लाख. ही विसंगती दूर कशी होणार? स्वच्छतेचा संबंध थेट आरोग्याशी असतो. आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आपले शहर आदर्श असावे, असे सर्वांनाच वाटायला हवे. नुसते वाटून उपयोग नाही, तर त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. नगर शहर आकाशाप्रमाणेच जमिनीवरूनही स्वच्छ व सुंदर दिसावं, अशी ‘दिव्य मराठी’ची इच्छा आहे. ते होण्यासाठी आता आपण दृढ संकल्प करू या...त्यासाठी नागरिकांनीही या अभियानात सहभागी होण्याची गरज आहे.
८४ चौरस किलोमीटर - शहराचे क्षेत्रफळ
४.५ लाख - शहराची लोकसंख्या
५३५७ लोकसंख्येची घनता
२३ कोटी - सफाईचा वार्षिक खर्च
१२५ टन - शहरातील रोजचा कचरा
काय म्हणतात, महापौर, उपमहापौर...
"स्वच्छ, सुंदर नगर'साठी ठोस पावले उचलू

""नगर शहरात किमान एक रस्ता स्वच्छ, सुंदर व हरित करणार. एका रस्त्याची निवड करून त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा साफसफाई करणार. डस्टबिन, कचरकुंड्या ठेवून नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करणार. हा रस्ता अतिक्रमणे, मोकाट जनावरे व कचरामुक्त असेल, शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार''
कचऱ्याचे वर्गीकरण
ओला कचरा : ३०%
सुका कचरा : ४० %
इतर कचरा : ३० %
मनपाची सफाई यंत्रणा
झाडू कामगार : ४९२
इतर कामगार : ३३३
एकूण कामगार :८२५
कंटेनर : ९०
सेफ्टिक टँक : २
डोजर : ३
ट्रॅक्टर : २
जेटिंग : १
एकूण वाहने : ९८

सक्षम यंत्रणेसाठी गरज
कामगार : २ हजार ५००, वाहने : ३५०
नगरसेवकांकडून अपेक्षा
प्रत्येक प्रभागात एक रस्ता तरी स्वच्छ व सुंदर करावा. प्रभागातील कचरा दररोज उचलण्याची व्यवस्था करण्यासाठी आग्रही राहण्याची गरज. कचरा कमीत कमी होण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने दक्ष राहून आपल्या प्रभागातील स्वच्छतेचा दैनंदिन आढावा घेण्याची आवश्यकता आहे. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी नागरिकांना स्वतंत्र डस्टबीन उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरुन नागरीकांनाही स्वच्छतेचे महत्व पटेल. अर्थात त्यासाठी नगरसेवकांसह नागरिकांचाही पुढाकार हवा.