आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुपारच्या सत्रातील स्वच्छता अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापौर संग्राम जगताप यांनी दुपारच्या सत्रात सुरू केलेला शहर स्वच्छतेचा प्रायोगिक उपक्रम अवघ्या चार दिवसांत अडचणी आला. दुपारच्या सत्रात काम करण्यास झाडू कामगारांनी विरोध केला आहे. सकाळच्या सत्रात दोन तास जास्त काम करू, पण दुपारी पुन्हा कामावर बोलवू नका, असे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर शहरात प्रथमच राबवण्यात येत असलेला एक चांगला उपक्रम बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत कामगार संघटनेचे पदाधिकारी व महापौरांच्या बैठकीत शुक्रवारी (31 जानेवारी) तोडगा काढण्यात येणार आहे.

महापौर जगताप यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सकाळप्रमाणेच दुपारच्या सत्रातही शहर स्वच्छतेचे काम सुरू ठेवण्याचा उपक्रम चार दिवसांपासून सुरू करण्यात आला. सर्व झाडू कामगारांसह बांधकाम व उद्यान विभागाच्या कर्मचार्‍यांना त्यात सहभागी करून घेण्यात आले. आतापर्यंत केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेत शहराच्या विविध भागात स्वच्छता होत होती. नव्या उपक्रमांतर्गत दुपारच्या सत्रातही स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे शहर स्वच्छ होण्यास मोठा हातभार लागणार आहे. परंतु झाडू कामगारांनी आता दुपारच्या सत्रात काम करण्यास नकार दिला आहे. सकाळच्या सत्रात काम केल्यानंतर सर्व कामगार घरी जातात. त्यांना दुपारी पुन्हा कामावर यावे लागते. अनेक कामगारांना रिक्षाने ये-जा करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक झळ बसते. त्यामुळे सकाळच्या सत्रात दोन तास जास्त काम करू, पण दुपारी पुन्हा कामावर बोलवू नका, असा पवित्रा झाडू कामगारांनी घेतला आहे.

काम करण्यास आमचा विरोध नाही, परंतु दुपारी पुन्हा कामावर येणे कामगारांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. याबाबत कामगार संघटनेचे पदाधिकारी व महापौरांची शुक्रवारी बैठक होणार आहे.

साडेचार लाख लोकसंख्येच्या शहरात दररोज 120 टन कचरा जमा होतो. तो उचलण्यासाठी मनपाकडे केवळ 550 कामगार आहेत. त्यामुळे फक्त 70 ते 80 टन कचर्‍याचे दररोज संकलन होते. उर्वरित कचरा विविध भागात तसाच पडून राहतो.

उपाशी राहून कामे होत नाही
दुपारच्या सत्रात काम करणे कामगारांना गैरसोयीचे आहे. सकाळी जास्त वेळ काम करण्याची तयारी आहे. परंतु सकाळी काम करून दुपारी पुन्हा कामावर येणे गैरसोयीचे आहे. एक तर पगार वेळेत होत नाहीत. प्रशासनाने पगार वेळेत होण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. उपाशी राहून कामगार काम कसे करणार? अनंत लोखंडे, अध्यक्ष, मनपा कामगार संघटना.

उपक्रमात अडचणी नाहीत
दुपारच्या सत्रात शहर स्वच्छतेच्या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. उपक्रम राबवण्यासाठी कोणत्याही अडचणी नाहीत. चार दिवसांपासून विविध ठिकाणी दुपारच्या सत्रात स्वच्छता करण्यात आली. सर्व कामगारांची दुपारी हजेरी घेण्यात येते. उपक्रम सुरू झाला असला, तरी त्याचे परिणाम आताच समोर येणार नाहीत.’’ डॉ. एन. एस. पैठणकर, उपआरोग्याधिकारी, मनपा.

कचरा कामगारांच्या मुळावर
तोकड्या मनुष्यबळामुळे शहरात दररोज जमा होणारा सुमारे 120 टन कचरा खासगी ठेकेदारामार्फत उचलणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेच्या जाचक अटी, शर्तींमुळे ठेकेदारांनी या कामाकडे पाठ फिरवली आहे. अनेकदा निविदा प्रसिध्द करूनही कचरा संकलनासाठी ठेकेदार मिळालेला नाही. त्यामुळे कचरा संकलनाचे काम महापालिका कामगारांच्या मुळावर आले आहे.

विल्हेवाटीचा प्रश्न कायम
कचरा उचलण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सक्षम नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज 70 ते 80 टन कचरा कोणतीही प्रक्रिया न करता बुरूडगाव कचरा डेपोत टाकण्यात येतो. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नसल्याने हा कचरा जाळण्यात येतो. महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद असले, तरी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न मात्र कायम आहे.