आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छता - कामचुकार कर्मचा-यांवर केली जाणार कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सावेडीतील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी यांनी केलेल्या पाहणीत समोर आले. कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
अनेक भागात कचरा वेळेत उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. कचरा गोळा करण्यासाठी विविध ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. या कुंड्यांमध्ये साचलेला कचरा वाहनांतून कचरा डेपोत टाकला जातो. अनेक नागरिक कुंडीऐवजी बाहेर कचरा टाकतात. यातील अजैविक कच-यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.

सावेडी प्रभागासाठी 9 घंटागाड्या, 5 ट्रॅक्टर, 92 सफाई कामगार, 22 गटार कामगार, चेंबर स्वच्छतेसाठी 8 व इतर कामांसाठी 4 कामगार आहेत. या प्रभागात टीव्ही सेंटर, जॉगिंग ट्रॅक, नागापूर फाटा, कोहिनूर मंगल कार्यालय, पिंपळगाव रस्ता, वीर सावरकर मार्ग, नवलेनगर आदी भागात कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.

महापौर संग्राम जगताप यांनी 31 जुलैला प्रभाग अधिका-यांशी चर्चा करून शहर स्वच्छतेचे आदेश दिले. त्यानुसार नूतन प्रभाग अधिकारी तडवी यांनी सावेडीत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी (1 ऑगस्ट) स्वच्छता निरीक्षक कुमार सारसकर, परीक्षित बीडकर यांची बैठक घेऊन स्वच्छतेच्या सूचना दिल्या. शनिवारी तडवी यांनी प्रभागातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी पाहणी केली. काही कामगारांकडून स्वच्छतेबाबत होत असलेला हलगर्जीपणा त्यांच्या निदर्शनास आला. कचरा वेळेत उचलला न गेल्याने कुंड्यांभोवती व इतर ठिकाणी कच-याचे ढीग साचलेले आढळले. त्यांनी तातडीने स्वच्छता निरीक्षकांना सूचना देऊन स्वच्छता करण्याचे आदेश दिले. जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही तडवी यांनी दिली.
नागरिकांनी सहकार्य करावे
नागरिक कुंडीऐवजी रस्त्यावर, तसेच इतरत्र कचरा टाकत असल्याचे आढळून आले. स्वच्छतेसाठी नागरिकांनीही सहकार्य करून कचरा कुंडीतच टाकावा.’’ एस. बी. तडवी, प्रभाग अधिकारी, सावेडी.

दंडात्मक कारवाई करावी - उघड्यावर कचरा टाकणा-या नागरिकांवर प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांनी तत्काळ दंडात्मक कारवाई करावी. असे झाले तर उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल. ’’ शिवाजी शेवाळे, नागरिक, नगर.