आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या औद्योगिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री लावणार हातभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या औद्योगिक प्रगतीसाठी हातभार लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर्मनीतील भेटीत उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिले.
जर्मनीतील हॅनोव्हर येथे भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनासाठी नगरच्या "आमी' संघटनेच्या नेतृत्वाखाली ४५ उद्योजकांचे शिष्टमंडळ गेले होते. केंद्रीय उद्योग वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नगरच्या उद्योजकांनी भेट घेतली.
नगरसारख्या औद्योगिकदृष्ट्या मागे पडलेल्या शहरातून ४५ उद्योजक जर्मनीला आलेले पाहून मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. नगरच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. लवकरच नगरला भेट देण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

या भेटीत नगरच्या उद्योजकांनी औद्योगिक देवाण-घेवाण, तसेच पार्टनरशिप जॉईंट व्हेंचरसाठी प्रयत्न केले. उद्योजक मिलिंद कुलकर्णी यांना त्यात यश आले. या करारासाठी या दौऱ्याचे आयोजक प्रफुल्ल पारख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी हॅनोव्हरचे महापौर इतर मान्यवर उपस्थित होते. तेथील महापौरांनी नगरचे महापौर संग्राम जगताप यांना जर्मनीस भेट देण्याचे आश्वासन दिले.जर्मनीच्या दौऱ्याचे औद्योगिक क्षेत्रात कौतुक होत असून लवकरच जपानचा दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगितले.

"मेक इन इंडिया'चा सर्वत्र बोलबाला

हॅनोव्हरयेथील प्रदर्शनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मेक इन इंडिया'चा बोलबाला जाणवला. भारतीय उद्योजकांकडे पाहण्याच्या यापूर्वीच्या दृष्टिकोनातही फरक पडल्याचे दिसत होते. "स्मार्ट सिटी' या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी भारतातील बऱ्याच उच्चपदस्थांनी या प्रदर्शनाला भेट दिली, असे नगरच्या उद्योजकांनी सांगितले.