आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौर कृषिपंपामुळे शेतकऱ्यांना मिळणार माफक दरात वीज; मुख्यमंत्री-अण्णा हजारे यांच्यात चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शेतकऱ्यांच्या चोवीस तास विजेची समस्या सोडवण्यासाठी शासनाने सौर कृषी वाहिनी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्रात पहिलाच प्रकल्प राळेगणसिद्धी येथे साकारत आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सकाळी होणार आहे, अशी माहिती जलसंधारण पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना माफक दरामध्ये चोवीस तास वीज उपलब्ध होणार आहे, असेही शिंदे म्हणाले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. राज्यातील एकूण वीजवापरापैकी कृषी क्षेत्रासाठी ३० टक्के ऊर्जेचा वापर होतो. प्रामुख्याने कृषिपंपाला वीजपुरवठा करण्यासाठी ही वीज वापरली जाते. त्यातून महावितरण कंपनीला मोठा महसुली तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कंपनीला दरवर्षी शासन मोठ्या प्रमाणात अनुदान देते. त्याबदल्यात वाणिज्य औद्योगिक ग्राहकांना सबसिडीच्या रुपाने वीज दर आकारला जातो.

राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध व्हावी, म्हणून राज्यात सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्यातील ज्या ग्रामीण भागात गावठाण कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले, अशा ठिकाणी कृषी वाहिनीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपारिक विजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. तसेच या विजेचा वापर इतर उत्पादनक्षम कामांकसाठी होऊ शकतो. त्यामुळे महावितरणचा वीज खरेदीवर होणारा खर्च कमी हाेईल, असेही शिंदे म्हणाले.
 
ज्या ग्रामीण भागांमध्ये कृषी वाहिनीचे सौर विद्युतीकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असे नाव देण्यात आले आहे. राळेगणसिद्धी यवतमाळ येथे सौर कृषी वाहिनी योजना प्रायोगिक तत्वावर महानिर्मिती कंपनीमार्फत राबवण्यात मान्यता दिली आहे. योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनी करणार असली, तरी महाऊर्जा महावितरण कंपनीचाही सहभाग असेल. कृषी वाहिनीचा भार, ग्राहकांची संख्या, शासकीय जमिनीची उपलब्धता विचारात घेऊन प्रकल्पांची निवड केली जाणार आहे.
 
तसेच राळेगणमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या ग्रामरक्षक दलची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सरपंच मेळाव्याचे आयोजनही केले आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राहणार आहेत. या कार्यक्रमाला ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद जलसंधारण मंत्री राम शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील प्रमुख पाहुणे असणार आहेत.

या दोन्ही कार्यक्रमांना खासदार दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, अामदार बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, अरूण जगताप, अपूर्व हिरे, शिवाजी कर्डिले, विजय आैटी, अादींसह राळेगण सिध्दीच्या सरपंच रोहिणी गाजरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व सरपंच नागरिक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, ऊर्जा प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले आहे.
 
ग्रामरक्षक दलांना वेग
अण्णाहजारे यांच्या संकल्पनेतून आलेल्या ग्रामरक्षक दलांना जिल्ह्यात अजूनही अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात अद्याप पावेतो ९४ गावांमध्येही ही दले स्थापन झाली आहेत. त्यामुळे उर्वरित गावांमध्ये दले स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. या दलांमध्ये अकरा सदस्य असतील. त्यापैकी महिला सदस्य असणार आहेत. या दलांसाठी अर्ज जास्त प्रमाणात अाले असले, तरी तांत्रिक अडचणींमुळे दले स्थापन झालेली नाहीत. ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेमुळे गावातील अवैध दारू इतर व्यवसायांना चाप बसण्यास मोठी मदत मिळणार आहे. सौर कृषी वाहिनी ग्रामसुरक्षा दल उपक्रम पथदर्शी म्हणून जिल्ह्यात राबवला जात आहे, याचे पालकमंत्री म्हणून मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन महिन्यांत पूर्ण
राळेगणमध्ये साकारली जात असलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे पालकमंत्री शिंदे म्हणाले. या योजनेमुळे भारनियमन कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सध्या शेतकऱ्यांना ज्या दरामध्ये वीज मिळते, त्याच किंवा त्यापेक्षा कमी दरात वीज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे शासनाचा वीज खरेदीचा खर्च वाचेल, असेही ते म्हणाले. राळेगणप्रमाणेच यवतमाळमध्येही प्रकल्प साकारत आहे.
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मनधरणी?
ज्येष्ठसमाजसेवक अण्णा हजारे यांनी लोेकपाल आंदोलन पुकारत पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. सरकारने आश्वासन देवूनही अद्याप लोकपाल कायदा झाला नाही. त्यामुळे अण्णा पुन्हा मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणला येत अाहेत. यावेळी दोघांमध्ये चर्चा होणार असल्याने अण्णांचे मन वळवण्याचा केला जाईल, अशी शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...